मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपासून राज्यामध्ये १५ दिवसांची संचारबंदी जाहीर केली आहे. त्याचबरोबर कडक निर्बंधही लावण्यात आलेले आहेत. पण हे सर्व करत असताना महाराष्ट्रातील मुंबईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांचे नेमके काय होणार, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. कारण मुंबईतील वानखेडे मैदानावर १० ते २५ एप्रिल दरम्यान १० लढती होणार आहेत. त्यामुळे या लढती रद्द होणार की खेळवण्यात येणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे. सध्याच्या घडीला देशातील करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशातील सर्वाधिक करोना रुग्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत आहेत. अशा स्थितीत वानखेडेवर आयपीएलचे सामने होतील का याबाबत शंका व्यक्त केली जात होती. यासंदर्भात राज्य सरकार कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष होते. यापूर्वीही वानखेडे स्टेडियमवर जेव्हा काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली होती, तेव्हादेखील हा प्रश्नच उपस्थित करण्यात आला होता. पण त्यानंतर आयपीएलमधील सामने खेळवण्यात आले होते. आजपासून महाराष्ट्रामध्ये १५ दिवसांची संचारबंदी असेल. त्यावेळी आयपीएलचे सामनेही रद्द होणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण महाराष्ट्रात संचारबंदी असली तर आयपीएलचे सामने रद्द होणार नाहीत. कारण यापूर्वीच महाराष्ट्राच्या सरकारने आयपीएलच्या सामन्यांना हिरवा कंदील दिला होता. त्यानुसार आयपीएलचे सामने हे सुरुच राहणार असल्याचे तरी सध्याच्या घडीला दिसत आहे. गेल्यावेळी महाराष्ट्राच्या सरकारने नेमकं काय सांगितलं होतं, पाहा...वानखेडे स्टेडियमवर जेव्हा कर्मचारी करोना पॉझिटीव्ह सापडले होते, त्यानंतरही राज्य मंत्रिमंडळाने आयपीएलचे सामने मुंबईतील वानखेडे मैदानावर होण्यास हिरवा कंदील दिला होता. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी ही माहिती दिली. राज्य सरकारने एक दिवस आधी करोना संदर्भातील नवे नियम जाहीर केले होते. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना मलिक म्हणाले होते की, "ही परवानगी अनेक अटींसह देण्यात आली आहे. मैदानावर प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. जे आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत त्यांना एका ठिकाणी आयसोलेशनमध्ये रहावे लागले. कोणत्याही परिस्थितीत गर्दी होता कामा नये या अटींवर परवानगी दिली आहे. त्यामुळे आयपीएलचे सामने रद्द होणार नाहीत."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3e0L3Kf
No comments:
Post a Comment