नवी दिल्ली : विराट कोहली, गेल्न मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स या तिन्ही मोठा फलंदाजांना आजच्या सामन्यात पंजाबच्या एकाच गोलंदाजाने बाद केले. हा पंजाबचा युवा गोलंदाज आहे हरमनप्रीत ब्रार. पण हा हरमनप्रीत ब्रार आहे तरी कोण, हा प्रश्न आता चाहत्यांना पडलेला आहे. हरमनप्रीत हा पंजाबचा एक युवा फिरकीपटू आहे. हरमनप्रीतला पंजाब किंग्स या संघाने २०१९ साली पहिल्यांदा संधी दिली होती. पण त्यानंतर तो जास्त काळ पंजाब किंग्सच्या संघात दिसला नाही. पण आजच्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या संघाने त्याला संधी दिली आणि या संधीचे त्याने सोने केले. आरसीबीची या सामन्यात १ बा ६२ अशी चांगली अवस्था होती. पण त्यानंतर हरमनप्रीतने विराट कोहलीला त्रिफळाचीत केले आणि आरसीबीला मोठा धक्का दिला. यावेळी कोहलीला तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३५ धावा करता आल्या. कोहली बाद झाल्यावर त्यानंतरच्याच चेंडूवर हरमनप्रीतने ग्लेन मॅक्सवेलला बाद केले आणि आरसीबीला दुसरा मोठा धक्का दिला. मॅक्सवेलला यावेळी भोपळाही फोडता आला नाही कोहली आणि मॅक्सवेल या दोन मोठ्या फलंदाजांना हरमनप्रीतने बाद केले होते. त्यानंतर आरसीबीच्या संघाची जबाबदारी ही एबीवर होती. यावेळी पुन्हा एबी मोठी खेळी साकारेल, असे वाटत होते. पण हरमनप्रीतने एबीलाही बाद केले आणि आरसीबीच्या संघांचे कंबरडे मोडले. एबीला यावेळी तीन धावांवरच समाधान मानावे लागले. एबीला हरमनप्रीतने यावेळी कर्णधार लोकेश राहुलकरवी झेलबाद केले. त्यामुळे हरमनप्रीतमुळे यावेळी आरसीबीची अवस्था १ बाद ६२ वरून ४ बाद ६९ अशी झालेली पाहायला मिळाली. हरमनप्रीतने यावेळी पंजाबसाठी भेदक मारा केला. हरमनप्रीतने यावेळी आपल्या चार षटकांमध्ये फक्त १९ धावा दिल्या. या १९ धावांच्या बदल्यात हरमनप्रीतने कोहली, मॅक्सवेल आणि एबी या महत्वाच्या फलंदाजांना बाद केले. आतापर्यंत हरमनप्रीतने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. आतापर्यंतच्या १९ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये हरमनप्रीतने २१ विकेट्स मिळवले आहेत. पण आजच्या सामन्यात हरमनप्रीतने मॅचविनरची कामगिरी करुन दाखवली आहे. त्यामुळे यापुढच्या सामन्यांमध्ये हरमनप्रीत कशी गोलंदाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3takd7M