भारतीय संघ येत्या १८ जूनपासून आसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीला सामोरा जातो आहे. इंग्लंडच्या साउदम्प्टनला होणाऱ्या या फायनलमध्ये आपली न्यूझीलंडशी गाठ पडले. याच दृष्टीकोणातून भारताचे महान फलंदाज यांनी मटाशी साधलेला हा खास संवाद... -इंग्लंडसारख्या संघाला इंग्लंडमध्येच हरवणे, आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये अव्वल होणे, कर्णधाराच्या अनुपस्थितीत सरस खेळ करणे, इंग्लिश खेळपट्ट्या साजेशा असणे... हे सगळे सकारात्मक मुद्दे न्यूझीलंडला भारताविरुद्धच्या फायनलमध्ये फायद्याचे ठरतील, असे वाटते का? इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवण्याचा न्यूझीलंडला नक्कीच फायदा होईल. मिळवलेल्या विजयाचा संबंधिताला कायमच फायदा होत असतो; कारण विजेत्याची मानसिकता तयार होते जी खूप महत्त्वपूर्ण ठरते. एक सकारात्मकता मनात आणि देहबोलीत भिनते. यामुळे ताकद दुप्पट झाल्यासारखी वाटते. न्यूझीलंड संघ सध्या याचा अनुभव घेत असणारच; पण केवळ याच मुद्यावरून भारतीय संघाला त्यांच्या तुलनेत कमी लेखणे मला पटत नाही. कारण आपला संघ खूप समतोल आहे. ही लढत मस्त रंगतदार होईल, कसोटी आणि क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानी ठरेल. उभय संघांकडून अव्वल दर्जाचा खेळ बघायला मिळेल, असे मला वाटते आहे. वाचा- -जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल तीन कसोटींच्या मालिकेसारखी हवी होती, असे मतप्रवाह निर्माण होतो आहे. तुमचा याबाबत काय दृष्टीकोन आहे? असे करायला काहीच हरकत नाही, असे मलाही वाटते. माझा दृष्टिकोन असा की, आपण वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक संघाविरुद्ध एकदाच खेळतो, फायनलमध्ये कदाचीत संबंधित संघासह दुसऱ्यांदा खेळण्याची वेळ येते. अशावेळी एकच फायनल असणे समजून घेता येते. मात्र जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा हा पहिला मोसम साधारण सव्वादोन वर्षांपासून सुरू आहे. आणि आता आपल्याला विजेता मिळणार आहे. अशावेळी तीन कसोटींची मालिका फायनलसारखी नक्कीच करता आली असती. जेणे करून पहिल्या किंवा तिसऱ्या कसोटीतून आपल्याला विजेता मिळाला असता. अर्थात थोडा आयसीसीच्या बाबतीतही विचार करायला हवा. क्रिकेटचा कार्यक्रम भरगच्च असतो. अशात फायनलही तीन कसोटींची घ्यायची तर तेवढा कालावधी राखून ठेवावा लागणार. हे प्रत्येकाला जमायला हवे. हा अजिंक्यपद स्पर्धेचा पहिलाच मोसम आहे, पुढे असा बदल घडेलही. वाचा- -इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळण्याचा तुम्हाला खूप मोठा अनुभव आहे. त्या पार्श्वभूमीवर या फायनलआधी तुम्ही भारतीय संघाला काय सूचना कराल? माझी पहिली सूचना अर्थातच अशी की, फलंदाजांचा ‘फ्रन्टफूट डीफेन्स’(बचाव) खूप भक्कम असावा. खासकरून वेगवान गोलंदाजांना. यात तुम्ही पैकीच्या पैकी गुण मिळवलेत, तर पुढील वाट खूप मस्त, सोपी होईल. पुढची सगळी चिंता मिटेल आणि तुम्ही अधिक सफाईदार खेळू शकाल. माझी दुसरी सूचना अशी की, चेंडूंना सामोरे जाताना शरीराच्या जेवढे जवळून खेळाल तेवढे चांगले आहे. त्यामुळे विकेट गमावण्याची जोखीम कमी असेल. स्विंगच्या माऱ्यालाही व्यवस्थित खेळता येईल. वाचा- -इंग्लंडमधील वातावरण दर तासाला बदलताना दिसते. कधी ढगाळ वातावरण, तर कधी लख्ख सूर्यप्रकाश. अशा वातावरणाचे फायदे, तोटे गोलंदाज आणि फलंदाज अशा दोघांनाही होतात. अशावेळी भारतीय संघाने कसे सजग रहावे? खासकरुन ढगाळ वातावरणात? हा वातावरणाचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. ढगाळ वातावरण असेल तर स्विंग, सिमला पोषक स्थिती निर्माण होते. मी इथे गाडी चालवतानाच्या मानसिकतेचे उदाहरण देतो. बघा... आपण गाडी चावताना लाल सिग्नल असेल तर थांबतो. बघतो, हिरवा सिंग्नल मिळाला की मग हळू हळू वेग धरतो. तिथे ढगाळ वातावरणात फलंदाजी करताना असेच करायचे आहे. थांबा, संयम बाळगा. आधी पहिल्या गेअरने सुरुवात करा... मग दुसरा आणि मग पुढचे गेअर टाकत मस्त फलंदाजीच्या सफरीवर स्वार व्हा. सूर्यप्रकाश लख्ख आला की, मात्र मस्त बिनधास्त खेळा. धावा नक्की होणार. -हे झाले फलंदाजांचे, न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलला सामोरे जाताना भारताच्या गोलंदाजांची मानसिकता कशी असावी? मला असे वाटते की, त्यांना फार काही करायची गरज नाही; त्यांनी खेळपट्टी आणि वातावरणाच्या स्थितीचे झटपट आकलन करून घ्यावे. स्विंग आणि सिम कसा मिळतो आहे, यावर लक्ष्य द्यावे. त्यानुसार आपल्या माऱ्यामध्ये विविधता आणण्यावर भर दिला जावा. तसेच संयम खूप महत्त्वाचा ठरणार आहे... कधीकधी अनेक तास अचूक मारा करूनही गाळाला विकेट लागत नाही. अशावेळी चित्त विचलीत होऊ द्यायचे नाही, निराश व्हायचे नाही... प्रयत्न सुरू ठेवायचे. प्रयत्नांती विकेट हा मंत्र जपायचा. वाचा- -कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन झाले, आपल्याला आता विजेताही लाभणार आहे... कसोटी क्रिकेटची लोकप्रियता वाढावी, प्रेक्षकांचे स्टेडियममध्ये येऊन कसोटी पाहणे वाढावे, यासाठी आयसीसीचा हा प्रयत्न आहे. हे कितपत यशस्वी झाले आहे, असे तुम्हाला वाटते? कसोटी क्रिकेटसाठी ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. आपण गेल्या काही मोसमातील कसोटी पाहिल्या असतील, तर त्या उत्कंठावर्धक झाल्या आहेत. या अजिंक्यपद स्पर्धेमुळे पाठिराखे क्रिकेटमध्ये अधिक जास्त प्रमाणात मिसळले गेले असे वाटते. बघा ना, एरव्ही आपण वर्ल्ड कपच्यावेळी सामने बघतानाच, गुणांची बेरीज वजाबाकीदेखील करतो. कसोटी अजिंक्यपदामुळे आता पाठिराखे कसोटीबाबतही ही आकडेमोड करू लागले. यामुळे पाठिराखे क्रिकेटमध्ये गुंतून राहिले. ही खरोखरच खूपच चांगली बाब आहे. जोश, उत्साह आहे. आताही भारत-न्यूझीलंड फायनलबद्दल खूप उत्सुकता आहे. इंग्लंडची संस्मरणीय मानवंदना... माझ्या कारकिर्दीतील उत्तरार्धात मी जेव्हा केव्हा इंग्लंडमध्ये खेळायला गेलो, तेव्हा मला इंग्लंडमधील क्रिकेट पाठिराख्यांचे प्रेम लाभले. जे संस्मरणीय आहे. मला आठवते आहे, फलंदाजीत माझा क्रमांक आला आणि मी ड्रेसिंग रुममधून बाहेर येत खेळपट्टीकडे निघालो की, स्टेडियममधील प्रेक्षक उठून उभे राहत मला मानवंदना द्यायचे. इंग्लंडचे पाठिराखे खूप कट्टर असतात. खासकरुन स्थानिक पाठिराखे. ते आपला संघ सोडून क्वचितच दुसऱ्यांची तारीफ करतात. माझ्याबाबतीत ते चित्र दिसले नाही. कधी इंग्लिश पाठिराख्यांची भेट झाली, तर ते म्हणायचे, ‘तुझ्या धावा होवोत; पण विजय इंग्लंडचा व्हावा’. त्यांची ती मानवंदना मला संस्मरणीय वाटते. -सचिन तेंडुलकर
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2U1SAlt
No comments:
Post a Comment