नवी दिल्ली: भारतात या वर्षी होणाऱ्या पुरुषांच्या टी-२० वर्ल्डकप संदर्भात एक मोठी अपडेट आली आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक समोर आले असून एका वेबसाइटने या संदर्भातील वृत्त दिले आहे. टी-२० वर्ल्डकप संदर्भातील सर्वात मोठी अपडेट म्हणजे ही स्पर्धा या वर्षी युएईमध्ये होणार आहे. वर्ल्डकपची सुरूवात १७ ऑक्टोबरपासून होईल आणि १४ नोव्हेंबर रोजी अंतिम मॅच खेळवली जाईल. आयपीएल २०२१च्या फायनल सामन्यानंतर काही दिवसातच टी-२० वर्ल्डकपला सुरूवात होईल. आयपीएलमधील उर्वरीत लढती युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होतील. त्याची फायनल १५ ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. अर्थात या वृत्ताला अद्याप भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने दुजोरा दिला नाही. देशातील करोना व्हायरस परिस्थितीमुळे गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भातील शक्यता व्यक्त केली जात होती. सध्याच्या नियोजनानुसार टी-२० वर्ल्डकपचा पहिला टप्पा ओमानमध्ये खेळवला जाऊ शकतो. त्यानंतरच्या लढती युएईमध्ये होतील. गेल्या वर्षी करोनामुळे ऑस्ट्रेलिया होणारा टी-२० वर्ल्डकप स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर आयसीसीने या वर्षी भारतात तर २०२२ साली ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्डकप होणार असल्याचे जाहीर केले होते. क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानसार टी-२० वर्ल्डकपच्या पहिल्या फेरीत १२ लढती होतील. आठ संघातील या लढतींमधून चार संघ सुपर १२ साठी पात्र होतील. सुपर १२ मध्ये ३० लढती होणार असून ज्याची सुरुवात २४ ऑक्टोबरपासून होण्याची शक्यता आहे. सुपर १२ मधील संघ दोन गटात विभागले जातील. त्याच्या लढती दुबई, अबुधाबी आणि शारजाह येथे होतील. त्यानंतर दोन सेमीफायनल आणि फायनल लढतींचे आयोजन होईल. या स्पर्धेचे आयोजन भारतात व्हावे अशी बीसीसीआयची इच्छा आहे. पण बोर्डाला केंद्र सरकारकडून कर सवलत मिळत नाही. त्याच बरोबर बायो बबलमध्ये करोना व्हायरसने प्रवेश केल्याने आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय खेळाडू भारतात येण्यास उत्सुक नाहीत. टी-२० वर्ल्डकप युएईमध्ये शिफ्ट केल्याने बीसीसीआय त्याच्या उत्पन्नाचा ४१ टक्के हिस्सा बचक करू शकतो. ही स्पर्धा भारतात झाली तर बोर्डाला मोठ्या प्रमाणात कर द्यावा लागतो. २०१६च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये बीसीसीआयला कर सवलत मिळाली नव्हती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3diFTcZ
No comments:
Post a Comment