साऊदम्पटन : फायनलमध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव झाला. पण फायनलसाठी भारताने चांगला संघ निवडला नव्हता. भारतीय संघातील चॅम्पियन खेळाडूंना यावेळी फायनलमध्ये संधीच दिली नसल्याचे आता समोर येत आहे. त्यामुळे चाहते कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर जोरदार टीका करत असल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात लढाऊ बाणा दाखवून भारताला कसोटी वाचवण्यात सिंहाचा वाटा उचलला होता तो हनुमा विहारीने. आतापर्यंत हनुमाने ८ सामन्यांमध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांसह ४५७ धावा केल्या आहेत. फायनलच्यापूर्वी मयांक हा इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत असल्याचे सर्वांनाच माहिती होते. त्यामुळे इंग्लंडच्या वातावणाशी हनुमाने चांगलेच जुळवून घेतले होते. त्यामुळे हनुमा हा एक चांगला पर्याय भारतीय संघासाठी ठरला असता. पण भारतीय संघाने फायनलच्या सामन्यात मात्र हनुमाला संधी दिली नाही. विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत भारताकडून दोन शतके आणि तीन अर्धशतके मयांक अगरवालने लगावली होती. मयांकने आतापर्यंतच्या १२ सामन्यांमध्ये ८५७ धावा केल्या होत्या. पण मयांकच्या नावाचा विचार यावेळी भारतीय संघाने केलाच नसल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाने फायनलमध्ये तीन वेगवान गोलंदाजांना उतरवले खरे, पण त्यांच्यापैकी जसप्रीत बुमरा हा अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले, त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. गेल्या बऱ्याच सामन्यांपासून बुमरा हा सातत्याने अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे त्याच्या जागी जर मोहम्मद सिराजसारख्या गोलंदाजाला संधी दिली असती तर भारतीय संघासाठी ते हिताचे ठरले असते. कारण सिराजने आतापर्यंतच्या कसोटी सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर भारताने यावेळी संघात दोन फिरकीपटूंची निवड केली होती आणि हेच भारतासाठी धोकादायक ठरले. कारण रवींद्र जडेजाला या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. दुसरीकडे न्यूझीलंडने चार वेगवान गोलंदाजांना मैदानात उतरवले होते आणि तेच त्यांच्या पथ्यावर पडले, त्यामुळे भारतीय संघाने जर चार वेगवान गोलंदाजाना खेळवले असते तर नक्कीच फर पडला असता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gOKg1r
No comments:
Post a Comment