नवी दिल्ली : राहुल द्रविड हा भारताचा एक महान खेळाडू होता. त्याचबरोबर प्रशिक्षणामध्येही राहुल द्रविड यशस्वी ठरला आहे. कारण भारताला युवा विश्वचषक जिंकवून देण्यात द्रविडचा मोलाचा वाटा होता. त्याचबरोबर आता भारतीय संघाचे प्रशिक्षकपदही द्रविडकडे सोपवण्यात आले आहे. द्रविडच्या या यशस्वी कोचिंगचं रहस्य आता सर्वांसमोर आले आहे. राहुल द्रविडने भारताच्या युवा संघाला प्रशिक्षण दिले आहे. या संघातील खेळाडू शुभमन गिलने द्रविडच्या कोचिंगचे रहस्य यावेळी सांगितले आहे. गिलने यावेळी सांगितले की, " जेव्हा एखादा फलंदाज अपयशी ठरत असतो तेव्हा द्रविड कधीही त्याच्या तंत्राबद्दल बोलत नाहीत. त्याचबरोबर तु हे कर किंवा हे करू नको, असं कधीही सांगत नाहीत. त्यावेळी द्रविड मानसीक आणि चतुर गोष्टींवर जास्त भर देत असतात. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये मानसीकता ही सर्वात महत्वाची असते आणि त्यावर द्रविड जास्त भर देताना दिसतात. काही लोकांना वाटते की, द्रविड हे तंत्रशुद्ध फलंदाज होते. त्यामुळे ते फक्त तंत्राबाबत बोलत असतील, पण असे कधीच होत नाही. त्यामुळेच खेळाडू त्यांच्याबरोबर असताना सहजपणे गोष्टी शिकतो." भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी द्रविड यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर पारस म्हाम्ब्रे यांना गोलंदाजी प्रशिक्षकपद देण्यात आले आहे. द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने युवा विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी पृथ्वी शॉ या संघाचा कर्णधार होता. श्रीलंकेच्या दौऱ्यात आता पृथ्वी शॉ यालाही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यात नेमकी कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे सोपवण्यात आले आहे. या संघात विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमरासारखे अनुभवी खेळाडू नसले तरी युवा खेळाडूंचा मोठा भरणा करण्यात आला आहे. त्यामुळे हे युवा खेळाडू श्रीलंकेच्या दौऱ्यात कशी कामगिरी करतात, याची उत्सुकता नक्कीच सर्वांना असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Sw0Qty
No comments:
Post a Comment