साऊदम्पटन : भारतीय संघाने फायनलमध्ये न्यूझीलंडच्या संघाला चांगलेच झुंजवले. पण त्यांना विजय मात्र मिळवता आला नाही. भारताने न्यूझीलंडपुढे १३९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने न्यूझीलंडच्या सलामीवीरांना झटपट बाद केले होते. पण त्यानंतर केन विल्यम्सन आणि रॉस टेलर यांनी दमदार फलंदाजी करत संघाला आठ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. भारतीय संघाने आज सहाव्या दिवशी २ बाद ६४ या धावसंख्येवरुन सुरुवात केली. भारताला फायनलच्या आजच्या महत्वाच्या दिवशी चांगली सुरुवात करता आली नाही. कारण भारताला पहिल्या सत्रात कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या रुपात मोठे धक्के बसले. त्यामुळे भारतीय संघाला डाव आता गडगडणार असे वाटत होते. पण त्यावेळी रिषभ पंत आणि रवींद्र जडेजाच्या संघाच्या मदतीला धावून आले. कारण या दोघांनी पहिल्या सत्राच्या अखेरीस आक्रमक फलंदाजी करत चांगल्या धावा जमवल्या. ही जोडी आता भारताला मोठी धावसंख्या उभारून देइल, असे वाटत होते. दुसऱ्या सत्रात पंत आणि जडेजाकडून संघाला फार मोठ्या अपेक्षा होत्या, पण या दोघांनीही यावेळी भारतीय चाहत्यांचा अपेक्षा भंग केला. कारण दुसऱ्या सत्राची सुरुवात झाल्यावर काही वेळातच पहिल्यांदा रवींद्र जडेजा (१६) बाद झाला. जडेजा बाद झाल्यावर संघाची जबाबदारी पंतच्या खांद्यावर आली होती. पण पंत यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादात आपली विकेट गमावून बसला. पंतने यावेळी चार चौकारांच्या जोरावर ४१ धावांची खेळी साकारली. भारताच्या डावातील ही सर्वाधिक धावांची खेळी ठरली. पंत बाद झाल्यावर भारताचा डाव काही वेळातच १७० धावांत संपुष्टात आला. यावेळी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीने सर्वाधिक चार विकेट्स पटकावले. साऊथीला यावेळी ट्रेंट बोल्टने तीन विकेट्स घेत चांगली साथ दिली. भारताने यावेळी न्यूझीलंडपुढे विजयासाठी १३९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना आर. अश्विनने बाद केले. यावेळी भारताला सामन्यात पुनरागमन करण्याची चांगली संधी होती. पण यावेळी चेतेश्वर पुजाराने रॉस टेलरचा २६ धावांवर झेल सोडला आणि त्याला जीवदान दिले. भारताला हा मोठा फटका बसला. कारण त्यानंतर टेलर आणि कर्णधार केन विल्यम्सन या जोडीने दमदार फलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने या फायनलचे जेतेपद पटकावले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35MoZzb
No comments:
Post a Comment