साऊदम्पटन : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. हा कोहलीचा पहिलाच मोठा पराभव नाही, तर आतापर्यंतच्या आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये कोहली हा सातत्याने अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे भारताचा कर्णधार बदलण्याची हीच योग्य वेळ आहे, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०१७ साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दाखल झाला होता. यावेळी भारतासमोर आव्हान होते ते पाकिस्तानचे. भारतीय संघाच्या बैठकीमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायची, असे ठरले होते. पण कोहलीने मात्र नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.कोहलीच्या या निर्णयाचा मोठा फटका भारतीय संघाला बसला आणि त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर २०१९ साली इंग्लंडमध्ये विश्वचषक खेळवण्यात आला होता. या विश्वचषकातही कोहली एक कर्णधार म्हणून अपयशी ठरला होता. या विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीतच बाहेर पडावे लागले होते. या विश्वचषकानंतर कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये वाद झाल्याचीही चर्चा रंगली होती. त्यानंतर आता फायनलमध्येही भारताला विराटच्या नेतृत्वाखाली पराभव पत्करावा लागला आहे. भारताचा कर्णधार बदलायचा असेल, तर काही पर्याय उपलब्ध आहेत. भारतीय संघ कसोटी, ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटसाठी वेगवेगळ्या कर्णधारांची नियुक्ती करू शकतो. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत रोहित शर्माने चांगली कामगिरी केली आहे आणि एक कर्णधार म्हणूनही तो यशस्वी ठरला आहे. त्यामुळे भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद रोहितकडे सोपवले जाऊ शकतो. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणे हा एक यशस्वी कर्णधार ठरला आहे, त्यामुळे भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद अजिंक्यकडे सोपवले जाऊ शकते. सध्याच्या घडीला तरी एकदिवसीय क्रिकेटचे कर्णधारपद हे कोहलीकडे असू शकते किंवा त्यासाठी रोहित शर्मा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामुळे हे बदल भारतीय संघात होणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. पण एवढ्या लवकर तातडीने भारतीय संघात असे बदल होतील, असे सध्याच्या घडीला तरी दिसत नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vNSevX
No comments:
Post a Comment