मुंबई : मुंबईच्या संघाचे प्रशिक्षकपद आता अमोल मुझुमदारकडे सोपवण्यात आले आहे. अमोलने यावेळी ९ क्रिकेटपटूंना मागे टाकून मुंबईचे प्रशिक्षकपद पटकावले आहे. अमोल यापूर्वी आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सच्या संघात फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत होता. त्याचबरोबर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्येही अमोलने काम केले असून त्याच्याकडे दांडगा अनुभव आहे. या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये वसिम जाफर, साईराज बहुतुले, सुलक्षण कुलकर्णी, बलविंदर सिंग संधू, प्रदीम सुंदरम, नंदन फडणीस, उमेश पटवाल आणि विनोद राघवन यांचा समावेश होता. पण अमोलने या सर्वांना मागे टाकत मुंबईच्या संघाचे प्रशिक्षकपद पटकावले आहे. रमेश पोवारकडे मुंबईच्या संघाचे प्रशिक्षकपद देण्यात आले होते. पण पोवारला भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक मिळाले आणि त्यामुळे त्याने मुंबईचे प्रशिक्षकपद सोडले होते. त्यानंतर आता या पदावर अमोल मुझुमदारची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट संघटना आता आपल्या प्रशिक्षकांचे मानधन वाढणार असल्याचेही समोर आले आहे. मुंबईच्या संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील, सचिव संजय नाईक आणि क्रिकेट सुधार समितीने प्रशिक्षकांना चांगले वेतन मिळावे, यासाठी संवाद साधला होता. यापूर्वी मुंबईच्या प्रशिक्षकाला वर्षाला १५-१० लाख रुपये मिळत होते, पण आता नवीन प्रशिक्षकाला ५० लाख एवढी रक्कम मिळू शकते, असे समजत आहे. त्यामुळे हा निर्णय मुंबईची संघटना अधिकृत निर्णय कधी घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अमोलने मुंबईच्या रणजी संघाचे कर्णधारपदही भूषवले होते. आतापर्यंत अमोनलने १७१ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ११ हजार १६७ धावा केल्या आहेत. यामध्ये ३० शतक आणि ६० अर्धशतकांचा समावेश आहे. एवढ्या दमदार धावा केल्यानंतरही अमोलला भारतीय संघाचे दरवाजे मात्र उघडण्यात आले नव्हते. पण स्थानिक क्रिकेटमध्ये मात्र अमोलचा चांगलाच दबदबा होता. त्यामुळे आता मुंबईच्या संघाचे प्रशिक्षकपद स्विकारल्यावर तो नेमके कोणते बदल करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्याचबरोबर आता मुंबईच्या संघात कोणता बदल होतो, हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3i9iCgQ
No comments:
Post a Comment