Ads

Thursday, June 17, 2021

आजपासून महाकसोटी; भारताला नवा इतिहास घडवण्याची संधी

साउदम्प्टन: भारतीय कसोटी क्रिकेट संघाने मागील दोन वर्षांपासून कामगिरीत सातत्य राखले आहे. मात्र, आता तो इतिहास झाला आहे. आता नवा इतिहास लिहिण्याची संधी भारतीय संघाला आहे. भारतीय संघ आजपासून (शुक्रवार) न्यूझीलंड संघाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीला सामोरा जात आहे. ही लढत इंग्लंडमध्ये होत असल्याने खेळपट्टी आणि त्यांना मिळालेला सराव यामुळे अनेकांना या लढतीत न्यूझीलंडचे पारडे जड वाटते आहे. मात्र, भारतीय संघ कुठेही कमी नाही आणि आम्हीच खऱ्या अर्थाने कसोटी क्रिकेटचे जगज्जेते आहोत, हे दाखवून देण्याची वेळ आला आली आहे. त्यासाठी केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडचे आव्हान परतवून लावण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. कोट्यवधी चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ सर्वोत्तम खेळ करील, यात शंकाच नाही. वाचा- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे यांच्या यशाचा वारसा आता विराट कोहली पुढे चालवित आहे. करोना काळात ही लढत होत असल्याने भारतीय खेळाडूंचा जास्तीचा वेळ हा विलगीकरणातच गेला आहे. त्यात इंग्लंडमध्ये पुरेसा सराव भारताला मिळालेला नाही. मात्र, इंग्लंडमध्ये खेळण्याचा पुरेसा अनुभव असलेले शिलेदार भारतीय संघात आहेत. तेव्हा या शिलेदारांच्या जोरावर कर्णधार कोहलीला आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवण्याची संधी आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळविणारा तो पहिलाच कर्णधार तर ठरेलच; पण भारताच्या खात्यात आयसीसीच्या स्पर्धेचे आणखी एक जेतेपद जमा करणारा कर्णधारांच्या पंक्तीतही तो जाऊन बसू शकतो. वाचा- मैदानातील युद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन तगडे संघ आमनेसामने आले आहेत. त्यामुळे भारताचे फलंदाज विरुद्ध न्यूझीलंडचे गोलंदाज; तसेच न्यूझीलंडचे फलंदाज विरुद्ध भारताचे गोलंदाज असे द्वंद्व मैदानात बघायला मिळेल. दोन्ही संघांतील खेळाडू चांगल्या लयीमध्ये आहेत. एकमेकांविरुद्ध खेळण्याचा, इंग्लंडमध्ये खेळण्याचा दोन्ही संघाला पुरेसा अनुभव आहे. आर. अश्विन, रवींद्र जडेजाची फिरकी विल्यमसन, रॉस टेलर, डेव्हॉन कॉन्वे यांना कशी रोखते... ट्रेंट बोल्ट, टीम साउदी ही न्यूझीलंडची वेगवान जोडी रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजाराला कसे वेसण घालते... कोहली, रहाणेची विकेट कोण घेणार... कुणाचे वेगवान आणि आखूड टप्प्याचे चेंडू कमाल करतात... कुठला अष्टपैलू प्रभावी ठरतो... क्षेत्ररक्षणात कोण वरचढ ठरते.... या साऱ्या प्रश्नांची उत्तरे पुढील पाच दिवसांत मिळणार आहेत. वाचा- भारताचे अंतिम अकरा निश्चित लढतीच्या आदल्या दिवशी भारताने अंतिम अकरा जणांचा संघ निश्चित केला. यात रोहित शर्मा-शुभमन गिल ही सलामी जोडी कायम असेल. पुजारा तिसऱ्या, कोहली चौथ्या आणि अजिंक्य रहाणे पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस येईल. यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंतवर विश्वास कायम ठेवण्यात आला आहे. भारतीय संघ या फायनलला दोन फिरकी आणि तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहे. आर. अश्विन-रवींद्र जडेजा ही फिरकी गोलंदाजांची जोडी असेल, तर जसप्रीत बुमराह, महंमद शमी आणि इशांत शर्मा यांना पसंती मिळाली आहे. सिराज, उमेश, विहारी, साहा यांना बाहेर बसावे लागेल. न्यूझीलंडमध्ये चुरस टॉम, कॉन्वे, विल्यमसन, टेलर, निकोल्स, वॉटलिंग, ग्रँडहोम, बोल्ट, साउदी, जेमिसन, पटेल असा न्यूझीलंडचा क्रम निश्चित मानला तर हेन्री, ब्लंडेल, नील वॅग्नर, विल यंग यांना बाहेर बसावे लागू शकते. वॅग्नर, हेन्री यांना अंतिम अकरासाठी स्पर्धा करावी लागू शकते. कसोटीला उभारी कसोटी क्रिकेटला १४४ वर्षांचा इतिहास आहे. यादरम्यान वन-डे आणि टी-२०मुळे क्रिकेट अधिक वेगवान झाले. यात कसोटी क्रिकेट मागे पडते की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येऊ लागली. त्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची संकल्पना मांडण्यात आली. या स्पर्धेला करोनाचा फटका बसला असला, तरी आता न्यूझीलंड-भारत या आव्हानात्मक संघांमध्ये अंतिम लढत होत आहे. विजेत्यांना साडेअकरा कोटी रुपये, तर उपविजेत्याला जवळपास सहा कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. पहिल्या दिवशी पावसाचा अंदाज फायनलच्या पहिल्या दिवशी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर हवामान सामान्य होत जाईल. आणि कसोटीच्या दुसऱ्या दिवशी थोडा हलका पाऊस होऊ शकतो. नंतर मात्र पावसाचा अडथळा येण्याची शक्यता कमी आहे. ढगाळ वातावरणामुळे खेळपट्टीकडून सुरुवातीला गोलंदाजांना मदत मिळेल. चेंडूला चांगला वेग आणि उसळी मिळण्याची शक्यता आहे. संघ : भारत - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, महंमद शमी, इशांत शर्मा. न्यूझीलंड - केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बीजे वॉटलिंग, कॉलिन डी ग्रँडहोम, ट्रेंट बोल्ट, टीम साउदी, काइल जेमिसन, अजाझ पटेल, टॉम ब्लंडेल, नील वॅग्नर, मॅट हेन्री, विल यंग. स्थळ : एजियस बाउल, साउदम्प्टन वेळ : दुपारी ३.३० पासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्स


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2SLXQcC

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...