मेरठ: भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर उद्या (२ जून) रवाना होणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर प्रथम न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू असताना भारताचा आणखी एक संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वनडे आणि टी-२० मालिका होणार आहे. वाचा- भारताच्या इंग्लंड दौऱ्या सोबतच श्रीलंका दौऱ्याची चर्चा देखील जोरदार सुरू आहे. पण लंकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या संघासाठी एक काळजीची बातमी समोर येत आहे. दुखापतीतून बाहेर आलेल्या भारतीय संघातील जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमारला करोनाची लक्षणे जाणवत आहेत. लंका दौऱ्यासाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. पण भुवीची नक्की निवड होईल असे मानले जात आहे. सोमवारी ३१ मे रोजी आलेल्या वृत्तानुसार भुवनेश्वर कुमारला करोनाची लक्षणे आहेत. त्याच्या पत्नीला देखील करोनाची लागण झाल्याची शंका आहे. या दोघांनी सध्या खबरदारी म्हणून मेरठ मधील गंगानगर येथील निवासस्थानी क्वारंटाइन करून घेतले आहे. काही दिवासांपूर्वी भुवीच्या आईला करोनाची लागण झाली होती आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वाचा- गेल्या काही दिवसांपासून भुवीवर एकापाठोपाठ एक संकट येत आहेत. काही दिवसापूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले. भुवीच्या वडिलांचे २० मे रोजी निधन झाले होते. त्याची आई सध्या रुग्णालयात आहे करोना विरुद्ध लढत आहे. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. वाचा- भुवनेश्वरच्या जवळच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता त्याला खोकल्याचा त्रास होत आहे. तर पत्नीला करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. आईला करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना तातडीने क्वारंटाइन करण्यात आले होते. पण आजारी असल्याने भुवी आणि त्याची पत्नी बऱ्याच दिवसांपासून त्यांची सेवा करत होता. यामुळे या दोघांनाही करोनाची लक्षणे जाणवत आहेत. या दोघांनीही करोनाच्या चाचणीसाठी नमुने दिले आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3i6yDUB
No comments:
Post a Comment