साऊदम्पटन : भारताच्या विजयाच्या मार्गात सर्वात मोठा अडसर आहे तो न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन. अश्विनच्या गोलंदाजीवर पंचांनी विल्यम्सनला बाद दिलं होतं, पण त्यानंतर जे काही घडलं त्यावर विश्वासच बसला नाही. नेमकं घडलं तरी काय, पाहा....ही गोष्ट घडली ती सोळव्या षटकात. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर विल्यम्सन मोठा फटका मारण्यासाठी गेला. यावेळी चेंडू स्टम्पच्या लाइनमध्ये पडला होता आणि तो थेट विल्यम्सनच्या पॅडला लागला. त्यावेळी भारतीय संघाने जोरदार अपील केले. मैदानावरील पंचांनी यावेळी विल्यम्सन बाद असल्याचे निर्णय दिला आणि भारतीय संघात आनंदाचे वातावरण पसरले. कारण विल्यम्सन हा भारताच्या मार्गातील मोठा अडसर होता. भारतीय संघाने यावेळी जोरदार सेलिब्रेशन सुरु केले. पंचांनी बाद दिल्यावर विल्यम्सन थोडासा नाराज दिसला. पण त्यानंतर विल्यम्सनने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. पंचांनी यावेळी चेंडू योग्य असल्याचा निर्वाळा दिला. जेव्हा चेंडू पॅडला लागत होता तेव्हा तो बॅटच्या संपर्कातही आला नव्हता. हे समजताच भारतीय चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले होते. विल्यम्सन आता बाद ठरणार, असे सर्वांनाच वाटत होते. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी चेंडू कुठे पडला आणि कोणत्या दिशेला गेला हे पाहिले. त्यावेळी चेंडू स्टम्पच्या लाइनमध्येच पडला होता. भारतासाठी ही जमेची बाजू होती. पण चेंडू स्टम्पच्या लाइनमध्ये पडला असला तरी तो स्टम्पला लागत नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी आपला निर्णय मैदानातील पंचांना सांगितला. मैदानातील पंचांना यावेळी आपला निर्णय बदलावा लागला आणि विल्यम्सन नाबाद असल्याचे स्पष्ट झाले. हा निर्णय आल्यावर भारताचा कर्णधार विराट कोहलीला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर या निर्णयानंतर कोहली नाराज झाला. कारण केन हा अनुभवी फलंदाज आहे आणि तो एकहाती सामना फिरवू शकतो. त्यामुळे केनला नाबाद घोषित केल्यावर कोहली निराश झाला होता. आता केनला बाद करण्याची रणनिती भारतीय संघाला पुन्हा एकदा आखावी लागणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gNGzsY
No comments:
Post a Comment