ईस्ट लंडन: पुढील महिन्यात होणाऱ्या १९ वर्षाखालील आयसीसी वर्ल्ड कप (U19 World Cup) आधी भारतीय संघाने (Indian U19 Team) धमाकेदार विजय मिळवला आहे. वनडे सामन्यात भारताच्या १९ वर्षाखालील संघाने दक्षिण आफ्रिकेचा ९ गडी राखून पराभव केला. वर्ल्ड कप स्पर्धेआधीचा या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणारच आहे. पण त्याच बरोबर विजेतेपदाचे मुख्य दावेदार देखील असल्याचे संदेश अन्य संघांपर्यंत पोहोचवण्यात टीम इंडिया यशस्वी झाली आहे. गत वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकेने ४८.३ षटकात सर्व बाद १८७ धावा केल्या. विजयाचे हे लक्ष्य भारताने एक विकेटच्या बदल्यात पार केले. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. वाचा- आफ्रिकेचा प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय अंगलट आला. एका फलंदाजाचा अपवाद वगळता अन्य कोणालाही मोठी धावसंख्या करता आली नाही. ब्यूफोर्टने ९१ चेंडूत सर्वाधिक ६४ धावा केल्या. भारतीय संघाकडून रवी बिश्नोईने (Ravi Bishnoi) तीन विकेट घेतल्या. तर कार्तिक त्यागी, शुभांग हेगडे आणि अथर्व अंकोलेकर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. भारताकडून दिव्यांश सक्सेनाने (Divyaansh Saxena) नाबाद ८६ धावा केल्या. त्याला एन.तिलक वर्मा याने ५९ धावांची साथ दिली. या दोघांनी पहिल्या विकटेसाठी १२७ धावांची शतकी भागिदारी केली. सक्सेना याने ११६ चेंडूत ११ चौकारांसह ८६ धावा केल्या. तर कुमार कुशाग्रने नाबाद ४३ धावा केल्या. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना २८ डिसेंबर रोजी होणार आहे. वाचा- आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात करेल. वर्ल्ड कपची सुरुवात १७ जानेवारीपासून होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना १९ जानेवारी रोजी श्रीलंकेविरुद्ध आहे. दुसरा सामना २१ जानेवारी रोजी जपान तर तिसरा सामना २४ जानेवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. भारताने आतापर्यंत चार (२०००, २००८, २०१२ आणि २०१८) वेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. तर दोन वेळा उपविजेतेपद मिळवले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2F923gp
No comments:
Post a Comment