नवी दिल्ली : भविष्यातील निर्णयांबाबत महेंद्रसिंह धोनीने कर्णधार विराट कोहली आणि निवडकर्त्यांशी संवाद नक्कीच साधला असेल, असा अंदाज बीसीसीआयचे अध्यक्ष यांनी व्यक्त केला. आयसीसी विश्वचषकापासून धोनी भारतीय संघापासून दूर आहे. त्यामुळे त्याच्या करिअरबाबत नेहमीच विविध चर्चा होत असतात. ‘इंडिया टुडे’च्या कार्यक्रमात धोनीबाबत प्रश्न विचारला असता सौरव गांगुली म्हणाले, ‘त्याचा (धोनी) कर्णधारासोबत संवाद झालाच असेल, निवडकर्त्यांशीही त्याचा संवाद झाला असेल याची मला खात्री आहे. पण त्याविषयी चर्चा करण्याची ही जागा नाही.’ सौरव गांगुली यांनी धोनीचं कौतुकही केलं. धोनीसारखा खेळाडू पुन्हा मिळणं कठीण आहे, असं ते म्हणाले. यष्टीरक्षक म्हणून धोनीने अमूल्य योगदान तर दिलंच आहे. पण २००७ मध्ये त्याने भारतीय संघाला पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक जिंकवून दिला. यानंतर २०११ मध्ये आयसीसी विश्वचषकही भारताने धोनीच्याच नेतृत्त्वात जिंकला. यावर गांगुली म्हणाले, ‘तुम्हाला पुन्हा दुसरा धोनी लवकर मिळणार नाही. पण पुढे खेळायचं की नाही हे ठरवणं त्याचा अधिकार आहे.’ दरम्यान, धोनीने अद्याप त्याच्याविषयी सुरू असलेल्या चर्चांवर कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. पुनरागमनाचे प्रश्न जानेवारी २०२० नंतर विचारा, असं तो मुंबईतील एका कार्यक्रमात म्हणाला होता. भारतीय संघाने अशात आयसीसी मालिका जिंकलेली नाही यावरही गांगुली यांनी मत मांडलं. यावर लवकरच विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले. भारताने २०१३ मध्ये धोनीच्या नेतृत्वात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर एकही चषक जिंकता आलेला नाही. धोनी थेट आयपीएलमध्ये दिसणार? महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने तीन वेळा विजेतेपद मिळवले आहे. सध्या धोनी भारतीय संघापासून दूर आहे. यामुळे तो निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. एका बाजूला धोनी टी-२० विश्वचषक खेळणार का अशी चर्चा सुरु असताना हे जवळपास निश्चित आहे की धोनी आयपीएलचा पुढील हंगाम नक्की खेळणार आहे. २००८ पासून धोनी चेन्नईचा कर्णधार आहे. पण २०२० नंतर धोनी क्रिकेट खेळणार का याबाबत अनेकांना शंका आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39gXhuR
No comments:
Post a Comment