गयाना : भारताच्या संघाने युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषकात पुन्हा एकदा दमदार कामगिरीचा नमुना पेश केला आहे. भारताने गतविजेत्या बांगलादेशच्या संघाला उपांत्यपूर्व फेरीत धळ चारली आणि सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. भारताने बांगलादेशचा यावेळी १११ धावांत खुर्दा उडवला, पण एकही धाव झालेली नसताना भारताला पहिला धक्का बसला होता. पण त्यानंतर भारताने आपला डाव सावरला आणि विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. बांगलादेशच्या ११२ धावांचा पाठलाग करताना भारताची एकही धाव झालेली नसताना त्यांना पहिला धक्का बसला. भारताचा सलामीवीर हरनूर सिंगला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. पण त्यानंतर अंगरीश रघुवंशी आणि शेख रशीद यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी रचली. रघुवंशीने यावेळी सात चौकारांच्या जोरावर ४४ धावा केल्या, तर रशीदने ३ चौकारांच्या जोरावर २६ धावा केल्या. हे दोघे पाच धावांच्या फरकाने बाद झाले आणि भारताची ३ बाद ७५ अशी स्थिती झाली होती. त्यानंतर कर्णधार यश धुलने दमदार फटकेबाजी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने यावेळी बांगलादेशवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला. भारताच्या रवी कुमारने यावेळी कर्णधार यश धुलचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य असल्याचे सामना सुरु झाल्यावर काही मिनिटांतच दाखवून दिले. कारण रवी कुमारने यावेळी बांगलादेशच्या पहिल्या तीन फलंदाजांनी झटपट बाद करत त्यांचे कंबरडे मोडले आणि या धक्क्यातून बांगलादेशचा संघ उभारी घेऊ शकला नाही. रवी कुमारने महफिझुल इस्लामला दोन धावांवर बाद केले, त्यानंतर त्याने इक्फताखेर हुसेनला एकच धाव करू देत तंबूचा रस्ता दाखवला. रवीने त्यानंतर प्रांतिक नवरोझ नबिलला ७ धावांवर बाद केले आणि बांगलादेशची ३ बाद १४ अशी दयनीय अवस्था केली. रवी कुमारनंतर विकी ओस्तवालने दोन विकेट्स मिळवल्या आणि बांगलादेशला अजून पिछाडीवर ढकलले. बांगलादेशकडून यावेळी एसएम मेहरोबने सर्वाधिक ३० धावा केल्या. मेहरोबच्या या३० धावांच्या जोरावरच बांगलादेशच्या संघाला शतकाची वेस ओलांडता आली आणि त्यांना १११ धावा तरी करता आल्या. जर मोहरोब लवकर बाद झाला असता तर बांगलादेशवर शतकदेखील पूर्ण न करण्याची नामुष्की ओढवली असती. भारताकडून रवी कुमारने तीन, विकी ओस्तवालने दोन आणि राज्यवर्धन हांगरगेकर, कौशल तांबे आणि अंगरीश रघुवंशी यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. बांगलादेशने २०२० साली झालेल्या युवा विश्वचषकात विजेतेपद पटकावले होते. या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत बांगलादेशने भारतावरच विजय साकारला होता. भारताने या सामन्यात १७७ धावा केल्या होत्या, पण डकवर्थ-लुईस नियमानुसार बांगलादेशला १७० धावांचे आव्हान विजयासाठी देण्यात आले होते. बांगलादेशने हे आव्हान यशस्वीरीत्या पेलले आणि त्यांनी विश्वचषक जिंकला. पराभवाचा बदला यावेळी भारताने सव्याज काढल्याचे पाहायला मिळाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/ThsVZGxQR
No comments:
Post a Comment