पार्ल : भारतीय संघाच्या मागे लागलेले पराभवाचे शुक्लकाष्ठ काही पाठ सोडायचे नाव घेत नसल्याचेच दिसत आहे. गेल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आता कर्णधार बदलल्यालवरही भारताला पहिल्या वनडे सामन्यात पराभवच पदरी पडला. दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार टेम्बा बवुमा आणि रॅसी व्हॅन डर डुसेन यांनी शतकं झळकावत भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी करताना २९६ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली होती. शिखर धवन आणि विराट कोहली यांनी अर्धशतके झळकावली, पण मोक्याच्या क्षणी त्यांनी आपल्या विकेट्स गमावल्या. त्यानंतर भारतीय संघाची पडझड सुरु झाली आणि त्यांच्यावर ३१ धावांनी सामना गमावण्याची वेळ आली. त्यामुळे आता तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने १-० अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या २९७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला कर्णधार लोकेश राहुलच्या रुपात पहिला धक्का बसला, त्याला १२ धावा करता आल्या. त्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी रचली. पण स्थिरस्थावर झाल्यावर हे दोघेही बाद झाले आणि भारताचे कंबरडे मोडले गेले. धवनने यावेळी संघात पुनरागमन करताना १० चौकारांच्या जोरावर ७९ धावा केल्या, तर कोहलीने तीन चौकारांच्या जोरावर ५१ धावा फटकावल्या. हे दोघे बाद झाल्यावर श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि वेंकटेश अय्यर यांना जास्त काळ खेळपट्टीवर तग धरता आला नाही आणि भारताच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. दक्षिण आफ्रिकेने यावेळी नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकेची सुरूवात फार चांगली झाली नाही. सलामीवीर मलानला जसप्रीत बुमराहने ६ धावांवर बाद करून पहिला धक्का दिला. तेव्हा आफ्रिकेने फक्त १९ धावा केल्या होत्या. त्यानंतर डी कॉक आणि कर्णधार बावुमाने यांनी धावांचा वेग वाढवला पण ही जोडी अर्धशतकानंतर अश्विनने फोडली. त्याने डी कॉकला २७ धावांवर बाद केले. त्यानंतर वेंकटेश अय्यरने एडेन मार्करामला ४ धावांवर बाद केले. मार्कराम बाद झाला तेव्हा द.आफ्रिकेची अवस्था ३ बाद ६८ अशी झाली होती. भारताने द.आफ्रिकेला सुरुवातीलाच रोखण्यात यश मिळवले होते. मात्र त्यानंतर चौथ्या विकेटसाठी बावुमा आणि डुसेन यांनी द्विशतकी भागिदारी करत इतिहास घडवला. बावुमाने शांत आणि संयमी खेळी केली. पण डुसेनने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने फक्त ८३ चेंडूत शतक पूर्ण केले. या दोघांनी भारतीय गोलंदाजांना विकेट मिळून दिली नाही. ही जोडी फोडण्यात बुमराहला ४९व्या षटकात यश आले. त्याने बावुमाने १४३ चेंडूत ११० धावा केल्या. डुसेनने ९६ चेंडूत ४ षटकार आणि ९ चौकारांसह नाबाद १२९ धावा केल्या. या दोघांनी रचलेली द्विशतकी भागीदारीच भारतासाठी महागडी ठरली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tH7Cgs
No comments:
Post a Comment