ऑकलंड: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला भारताने २० षटकात १३२ धावावर रोखले. न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी पहिल्या षटकापासून आक्रमक खेळ केला. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्टिन गप्टिल आणि कॉलिन मुन्रो यांनी संघाला शानदार सुरूवात करून दिली. गप्टिलने पहिल्याच षटकात २ षटकार मारून १३ धावा केल्या. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली. शार्दुल ठाकूरने सहाव्या षटकात गप्टिल याला बाद केले आणि न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर नवव्या षटकात शिवम दुबेने मुन्रोला २६ धावांवर बाद केले. सलामीची जोडी बाद झाल्यानंतर ग्रँडहोमला जडेजाने ३ धावांवर बाद करत माघारी पाठवले. त्यानंतर पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या धोकादायक केन विल्यम्सनला जडेजाने १४ धावांवर बाद करत न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. विल्यम्सन बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची अवस्था ४ बाद ८१ अशी होती. त्यानंतर रॉस टेलरने धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय गोलंदाजांनी त्याला फार संधी दिली नाही. टेलर अखेरच्या षटकात १८ धावांवर बाद झाला. पहिल्या सामन्यात २०३ धावा देणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला १३२ धावात रोखले. भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर बुमराह, शार्दुल ठाकूर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36swklx
No comments:
Post a Comment