पॉटशेफस्ट्रूम (द. आफ्रिका): भारताचा रवी बिश्नोई आणि ऑस्ट्रेलियाचा तन्वीर सांघा या दोन मनगटी फिरकी गोलंदाजांमध्ये सरस कोण ठरणार, हे मंगळवारी बघायला मिळेल. निमित्त आहे ते १९ वर्षांखालालील वनडे वर्ल्डकपमधील भारत वि. ऑस्ट्रेलिया या उपांत्यपूर्व फेरीचे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मागील काही सामन्यांत मनगटी फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व बघायला मिळाले आहे. याला ज्युनियर क्रिकेटही अपवाद राहिलेले नाही. बिश्नोईनेही आपल्या फिरकीच्या जोरावर भारताच्या विजयी वाटचालीत आतापर्यंत मोलाचा वाटा उचलला आहे. गतविजेत्या भारताने सलामीला श्रीलंकेवर तर यानंतर नवख्या जपानवर मात केली होती. यानंतर न्यूझीलंडविरुद्धची लढत भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार जिंकली. बिश्नोईने तीन सामन्यांत १० विकेट टिपल्या आहेत. गटातील सलग तिन्ही लढती जिंकून भारताने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला सलामीच्या लढतीत विंडीजकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर ऑस्ट्रेलियाने नायजेरिया आणि इंग्लंडवर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. लिंबू-टिंबू समजल्या जाणाऱ्या नायजेरियाविरुद्ध सांघाने १० षटकांत १४ धावांत पाच विकेट घेतल्या होत्या. त्या आधीच्या लढतीत त्याने विंडीजविरुद्ध चार, तर इंग्लंडविरुद्ध एक विकेट मिळवली आहे. तेव्हा या दोन्ही फिरकी गोलंदाजांची कामगिरी आपापल्या संघाच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. फलंदाजांकडून अपेक्षा श्रीलंकेविरुद्धची लढत सोडली, तर तसा भारताच्या फलंदाजांचा अद्याप कस लागलेला नाही. यशस्वी जैस्वालने दोन अर्धशतके ठोकली आहेत. त्याचबरोबर दिव्यांश सक्सेना, प्रियम गर्ग, तिलक वर्मा, जुरेल, सिद्धेश वीर अशी चांगली फळी भारताकडे आहे. इतिहास भारताच्या बाजूने ज्युनियर गटात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे पारडे जड राहिले आहे. २०१३ पासून १९ वर्षांखालील गटात भारत-ऑस्ट्रेलिया पाच वेळा आमनेसामने आले आहेत. यातील चार लढती भारताने जिंकल्या असून, एक लढत पावसामुळे अनिर्णित राहिली आहे. तेव्हा उपांत्यपूर्व फेरीत भारताचेच पारडे जड मानले जात आहे. सामन्याची वेळ : दुपारी १.३० पासून
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RUrpUX
No comments:
Post a Comment