जमैका:भारतीय क्रिकेट संघानं वेस्ट इंडीजला त्यांच्यात भूमीत धूळ चारून कसोटी मालिका २-० ने जिंकली आहे. भारतानं पहिला कसोटी सामना ३१८ धावांनी जिंकला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात २५७ धावांनी विजय मिळवला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा हा २८वा विजय आहे. या विजयासह कोहलीनं आणखी एक विक्रम नावावर केला आहे. महेंद्रसिंग धोनीचा २७ कसोटी विजयाचा विक्रम मोडीत काढत सर्वात यशस्वी कर्णधार होण्याचा मान त्यानं मिळवला आहे. भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडीजसमोर ४६८ धावांचं तगडं आव्हान ठेवलं होतं. मात्र, चौथ्या दिवशीच दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडीजचा फडशा पाडला. २१० धावांवर वेस्ट इंडीजला गारद केलं. सामना जिंकल्यानंतर विराटनं संघ सहकाऱ्यांचं कौतुक केलं. सांघिक कामगिरीशिवाय हा विजयी विक्रम नोंदवणं शक्य नव्हतं. गोलंदाजांचंही त्यानं कौतुक केलं. कोहलीनं ४८ कसोटी सामन्यात संघाचं नेतृत्व करताना २८ विजय मिळवले आहेत. धोनीनं ६० पैकी २७ सामने जिंकले आहेत. सौरव गांगुलीनं ४९ पैकी २१ सामने जिंकले होते. अजहरुद्दीननं १४ कसोटी सामने जिंकले होते. कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ केवळ १० सामन्यांत पराभूत झाला आहे. तर धोनीच्या नेतृत्वात संघाला १८ सामन्यांत पराभूत व्हावं लागलं होतं. भारताच्या बाहेर कोहलीनं १३ विजय मिळवले आहेत. कोहली हा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना जिंकून विराटनं सौरव गांगुलीचा ११ सामन्यांतील विजयाचा विक्रम मोडला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2LphMKF
No comments:
Post a Comment