रांची : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकापासूनच क्रिकेटपासून दूर आहे. एकीकडे धोनीच्या निवृत्तीची चर्चा होत असते, तर दुसरीकडे धोनी हा नेहमीच ‘कूल’ असतो. नुकताच धोनीचा एक फोटो समोर आला आहे, ज्यात तो केदार जाधव, माजी गोलंदाज आरपी सिंह यांच्यासोबत गोल्फ खेळताना दिसत आहे. केदार जाधवने सोशल मीडियावर धोनीसोबतचा फोटो शेअर केला, ज्यात आरपी सिंह दिसत आहे. आरपी सिंहनेही या फोटोला रिट्वीट केलं. जुन्या सहकाऱ्यांसोबत वेळ घालवणं खेळापेक्षाही जास्त चांगलं होतं, असं आरपी सिंह म्हणाला. यापूर्वी धोनी त्याचं शहर रांचीमध्ये नेट प्रॅक्टिस करताना दिसत होता. त्यामुळे धोनी पुन्हा एकदा कमबॅकची तयारी करत असल्याचा अंदाज लावण्यात आला. विश्वचषकानंतर धोनीने सैन्यासोबतही वेळ घालवला होता. त्याने जम्मू काश्मीरमध्येही कर्तव्य बजावलं होतं. विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाला होता. धोनीनेही या सामन्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. मात्र अखेरच्या क्षणाला धोनी बाद झाला आणि भारताच्या विजयाच्या आशाही मावळल्या. या सामन्यातील पराभवानंतर धोनीवर टीकाही करण्यात आली, तर त्याचं समर्थनही काही चाहत्यांनी केलं. भारताने विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध मालिका खेळली. मात्र यामध्ये धोनीचा समावेश नव्हता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NRPX05
No comments:
Post a Comment