चेन्नई: 'कॅप्टन कूल' महेंद्र सिंह धोनी क्रिकेटच्या मैदानात भलेही प्रत्येकाला सतत सूचना करत असले, पण घरच्या मैदानावर सगळे निर्णय त्याची पत्नी साक्षीच घेते. धोनीचं म्हणणं असं आहे की पत्नीने घेतलेल्या निर्णयांमध्ये मी कधीच पडत नाही. ३८ वर्षीय धोनी चेष्टेच्या मूडमध्ये म्हणतो, 'मला पक्कं ठाऊक आहे की ती खूश राहील तर मी खूश राहू शकेन!' भारताला दोन विश्वचषक जिंकून देणाऱ्या महेंद्र सिंह धोनीने २०१० मध्ये साक्षीसोबत लग्नगाठ बांधली होती. चेन्नईत एका ऑनलाइन मॅरेज पोर्टलच्या कार्यक्रमाला धोनी गेला होता. तो म्हणाला, 'लग्न होईपर्यंत सर्व पुरुष वाघ असतात. मी आदर्श पती आहे. मी पत्नीला सगळे निर्णय घेऊ देतो. मला माहितीय की ती खूश असेल तरच मी खूश राहू शकेन. माझी पत्नी तेव्हाच खूश राहील जेव्हा मी तिच्या प्रत्येक हो ला हो करेन.' धोनी म्हणतो, 'वयानुसार नाती अधिक दृढ होत जातात. लग्नाचं सार ५० वर्षांनंतर आहे. एकदा ५५ वर्षं पार केली की ते खरं प्रेमाचं वय असतं. त्यावेळी तुमची दिनचर्या बदलून गेलेली असते.' महेंद्र सिंह धोनीच्या क्रिकेट करिअरच्या भवितव्याविषयी गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे. तो पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलनंतरच आपल्या कारकिर्दीच्या पुढीव वाटचालीविषयीचा निर्णय घेणार असल्याचे त्याच्या एका जवळच्या सूत्रांनी सांगितले. धोनी सध्या काय करतो? टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर क्रिकेटपासून दूर आहे. तेव्हापासून धोनीच्या निवृत्तीवर चर्चा सुरूच आहे. धोनी लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल अशी चर्चाही मध्यंतरी झाली. मात्र 'तो सध्या काय करतो?' असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. त्यात धोनीचा एक फोटो समोर आला होता. तो केदार जाधव, माजी गोलंदाज आरपी सिंह यांच्यासोबत गोल्फ खेळताना दिसला होता. वर्ल्डकप स्पर्धेत सेमिफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाला होता. त्यानंतर धोनीनं क्रिकेटमधून ब्रेक घेतला आणि लष्करात प्रशिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांसाठी त्याची नियुक्ती श्रीनगरमध्ये करण्यात आली होती. तेव्हापासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34pSfcM
No comments:
Post a Comment