बंगळुरू : कर्नाटक प्रीमिअर लीग (केपीएल) मधील मॅच फिक्सिंग प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषन शाखेचा कसून तपास सुरू आहे. या तपासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूचं नाव समोर आलं आहे. गुन्हे शाखेने टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अभिमन्यू मिथुनला केपीएल सट्टेबाजीप्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. सहपोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. मिथुन केपीएलमध्ये शिवमोगा लायन्स संघाचं नेतृत्त्व करतो. त्याला समन्स बजावण्यात आल्याचं वृत्त समोर आल्यानंतर संदीप पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला. मिथुन सध्या सुरतमध्ये टी-२० खेळत आहे. मिथुनने भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं असल्यामुळे याची माहिती बीसीसीआयलाही देण्यात आली आहे. मिथुनला केपीएल फिक्सिंग प्रकरणी काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातील, असं संदीप पाटील म्हणाले. गुन्हे शाखेने केपीएल फिक्सिंग प्रकरणी जुलैपासून आतापर्यंत एकूण आठ जणांना अटक केली आहे. यात बेळगाव पँथर्सचे मालक अली अश्फाक थारा यांचाही समावेश आहे. कर्नाटक हायकोर्टाने बुधवारी अली यांचा जामीन अर्जही फेटाळला होता. गेल्या आठवड्यातच गुन्हे शाखेने कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आणि केपीएल संघाच्या व्यवस्थापकांना चौकशीसाठी नोटीस जारी केली होती. त्यावेळीही मिथुनशी संपर्क करण्याचा प्रयत्न झाला. पण त्याच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता. मिथुनने भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करताना पाच वन डे आणि चार कसोटी सामने खेळले आहेत. २५ ऑक्टोबर २०१९ रोजी तामिळनाडू विरुद्ध विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कर्नाटकचं प्रतिनिधित्व करताना मिथुनने ५० व्या षटकात हॅट्ट्रिक घेऊन कमाल केली होती. विशेष म्हणजे त्या दिवशी मिथुनचा जन्मदिवसही होता. वयाचे ३० वर्ष पूर्ण करण्याच्या दिवशीच त्याने हॅट्ट्रिक घेऊन क्षण अविस्मरणीय बनवला. या अविस्मरणीय सामन्यात त्याने एकूण ५ विकेट्स घेतल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2L5Yn23
No comments:
Post a Comment