राजकोट: एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी विजय मिळवत पहिल्या सामन्याचं उट्ट्ं काढलं. या मालिकेत आता भारताची ऑस्ट्रेलियाशी १-१ अशी बरोबरी झाली आहे. मालिकेतला अखेरचा निर्णायक सामना बेंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडिअमवर रविवारी १९ जानेवारीला रंगणार आहे. मालिकेतल्या पहिल्या सामन्यात झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर शुक्रवारी भारतीय संघ जणू सूडाच्या भावनेने पेटला होता. टीम इंडियाने ५० षटकांत ६ विकेट्सवर ३४० धावांचा दणदणीत स्कोअर केला. ३४० धावांचे आव्हान पेलताना ऑस्ट्रेलियाची दमछाक झाली. स्टीव्ह स्मिथ ९८ धावांवर बाद झाल्याने त्याचं शतक हुकलं. स्मिथची फलंदाजी ऑस्ट्रेलियाला मात्र तारू शकली नाही. दुसरीकडे, शिखर धवनची दमदार ९६ धावांची खेळी भारतीय धावसंख्येला मोठं बळ देऊन गेली. शिखर याच्या ९६ धावांसह लोकेश राहुलच्या ८० धावा आणि कर्णधार विराट कोहलीच्या ७८ धावांच्या जोरावर भारताला ३४० धावांचा डोंगर उभा करता आला. फलंदाजीच्या वेळी जायबंदी झालेला शिखर धवन क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरला नव्हता. त्याच्या जागी युजवेंद्र चहल आला होता. जायबंदी ऋषभ पंतच्या जागी मनीष पांडे तर शार्दुल ठाकूरच्या जागी नवदीप सैनीला आजच्या सामन्यात संधी देण्यात आली होती. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीच्या मिळालेल्या संधीचं भारताने सोनं केलं. मोठी धावसंख्या उभारण्याशिवाय भारताला पर्याय नव्हता. मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला वानखेडेवर १० विकेट्सने मात देत ऑस्ट्रेलियाने मैदान गाजवले होते. त्याचा वचपा काढण्याचे काम आज भारताने चोख बजावले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2TA1CUO
No comments:
Post a Comment