नवी दिल्ली: गुलाबी रंगाच्या चेंडूनं खेळण्यात येणाऱ्या पहिल्या डे-नाइट कसोटीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या कसोटी सामन्यासाठी खेळाडूंनी जय्यत तयारी केली असली तरी निवड समितीला संघ समतोलाच्या चिंतेनं ग्रासलं आहे. फिरकीला पोषक असलेल्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर नेमके किती वेगवान गोलंदाज खेळवायचे, असा प्रश्न निवड समितीला पडला आहे. येत्या २२ नोव्हेंबरपासून बांगलादेश विरुद्ध भारत असा डे-नाइट कसोटी सामना रंगणार आहे. त्यामुळं संघात काही बदल करावे लागणार आहेत. त्यावरूनच सध्या काथ्याकूट सुरू आहे. इंदूरमधील कसोटी सामन्यात भारतीय संघानं तीन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाज खेळवले होते. मात्र, त्या सामन्यात फिरकीपटूंची गरजच भासली नाही. वेगवान गोलंदाजांनीच सर्व सूत्रे हाती घेऊन पाहुण्या संघाचे कंबरडे मोडले. प्रकाश झोतातील सामन्यात गुलाबी चेंडू नेमका किती वळेल, याबद्दल साशंकता आहे. गुलाबी चेंडूने खेळण्याचा अनुभव असलेला झारखंडचा फिरकीपटू शाहबाज नदीमच्या मतानुसार, 'गुलाबी चेंडूनं गोलंदाजी करणाऱ्या फिरकीपटूंनी चेंडूच्या टर्नऐवजी अचूक टप्प्याकडं लक्ष केंद्रीत करायला हवं. एक लाइन पकडून गोलंदाजी केल्यास फिरकीपटूंना फायदा होऊ शकतो.' हनुमा की जडेजा? सध्या आर. अश्विन व रवींद्र जडेजा हे तीन फिरकीपटू भारतीय संघात आहेत. इंदूर कसोटीत या दोघांनाही संधी मिळाली होती. मात्र, कोलकात्यात यापैकी एकालाच संधी मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत निवड समितीची पहिली पसंती अश्विनला असेल. अश्विनकडे जडेजाइतका चेंडू वळवण्याची क्षमता नसली तरी गोलंदाजीतील बदल व लाइन-लेंथच्या मदतीनं फलंदाजांना जखडून ठेवण्यात माहीर आहे. संघात सध्या मोहम्मद शमी, उमेश यादव आणि इंशात शर्मा असे तीन वेगवान गोलंदाज आहेत. एका फिरकीपटूला वगळल्यास त्या जागी एका चांगल्या फलंदाजाला संधी मिळू शकते. हनुमा विहारी हा त्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. वेळ पडल्यास विहारी फिरकी गोलंदाजी करू शकतो. जडेजा आणि हनुमा यांच्यात निवड करताना निवड समितीला खूपच खल करावा लागेल, असे दिसते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/358fgAW
No comments:
Post a Comment