कोलकाता: गुलाबी रंगाच्या चेंडूने खेळवल्या जाणाऱ्या देशातील पहिल्यावहिल्या सामन्याची तुलना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानं भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याशी केली आहे. 'गुलाबी चेंडूनं कसोटी खेळणं आव्हानात्मक असेल. विश्वचषकात होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याइतकंच ते थरारक असेल,' असं विराटनं म्हटलं आहे. भारतातील पहिला दिवसरात्र कसोटी सामना उद्या कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर होणार आहे. या ऐतिहासिक सामन्याची उत्सुकता एव्हाना शिगेला पोहोचली आहे. कसोटीच्या पहिल्या चार दिवसांची तिकीटे संपली आहेत. मात्र, ही कसोटी गुलाबी चेंडूसह होत असल्यानं क्रिकेटपटू सावध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. विराटची प्रतिक्रिया देखील काहीशी अशीच आहे. 'गुलाबी चेंडूनं खेळणं कठीण असेल. गोलंदाजी कशी होतेय. फलंदाज चेंडूचा सामना कसा करतात हे पाहावं लागेल. सवय झाल्यानंतर खेळणं कदाचित सोपं जाईल,' असं तो म्हणाला. कोलकाता कसोटीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची चिन्हं आहेत. त्या विषयी विराटनं आनंद व्यक्त केला. 'गुलाबी चेंडूविषयी लोकांना उत्सुकता आहे. अशी उत्सुकता एकेकाळी भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळी असायची. तेव्हा दिग्गज क्रिकेटपटू मैदानात असायचे. सगळीकडं याच सामन्याची चर्चा व्हायची. आताही तसंच वातावरण आहे,' असं तो म्हणाला. 'गुलाबी चेंडूनं खेळताना क्षेत्ररक्षण करणं कठीण जाईल. गुलाबी चेंडू वेगानं हातावर आदळतो. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना मला याचा अनुभव आलाय. अर्थात, हा सामना खेळताना आम्हाला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळेल. मैदानावरील दवबिंदू देखील सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. दव कधी पडेल आणि कधी त्याचं प्रमाण जास्त असेल याचा काहीही नेम नसतो. अशा परिस्थितीत शेवटचं सत्र महत्त्वाचं असेल,' असं विराट म्हणाला. गेल्या काही वर्षांपासून बीसीसीआयनं कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे. क्रिकेटपटूंच्या करारातून ते स्पष्ट दिसतं. करार करताना बीसीसीआय कसोटीपटूंना झुकतं माप देतं,' असं विराटनं सांगितलं.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33bVIud
No comments:
Post a Comment