Ads

Tuesday, November 19, 2019

कसोटी क्रिकेटसाठी राहुल द्रविडचा संजीवनी मंत्र

वृत्तसंस्था, नवी दिल्ली ‘दिवस-रात्र कसोटीचे आयोजन प्रेक्षकांना पुन्हा स्टेडियममध्ये खेचून आणेलच; पण कसोटी क्रिकेटला संजीवनी देण्यासाठी, कसोटीचा प्रेक्षक वाढवण्यासाठी इतर मुद्यांवरही सुधारणा अपेक्षित आहे’, असे सूचक विधान भारताचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख राहुल द्रविडने मंगळवारी केले. वयचोरी, मैदानातील माळ्यांची मेहनत, कार्यालयीन क्रिकेट, रणजी स्पर्धा, कसोटींचे महत्त्व अशा मुद्यांवर राहुल द्रविडने कायम स्पष्ट भाष्य केले आहे. आता त्याने कसोटीच्या पुनरुज्जीवनासाठी अशा सूचना केल्या, ज्यांचा आधी कुणी विचारच केला नव्हता. ‘कसोटी क्रिकेटच्या संजीवनीसाठी दिवसरात्र कसोटींचे आयोजन हा एकमेव तोडगा नाही. तसेही आपण दवाच्या परिणामांवर नियंत्रण मिळवू शकलो तर दिवस-रात्र कसोटी वर्षांत एकदा, दोनदा नक्की आयोजित करता येईल. दवामुळे चेंडू ओलसर होतो, ज्यामुळे गोलंदाजांची कसोटी लागते. अशा परिस्थितीत चेंडू स्विंगही करता येत नाही. ही दिवस-रात्र कसोटीतील आव्हाने आहेत’, इकॉनॉमिक टाइम्सशी संवाद साधताना द्रविडने हे मुद्दे मांडले. यावरही लक्ष द्या... ‘कसोटी क्रिकेटपासून प्रेक्षक का दुरावला? या प्रश्नाचे उत्तर शोधताना अनेक कारणे पुढे येतात. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना कुठल्या सोयीसुविधा मिळतात हे आपण पाहिले आहे का? त्या सुविधांवर प्रेक्षक नक्की खूष आहेत का, हा मुद्दाही महत्त्वाचा आहे’, असे द्रविडने नमूद केले. द्रविडने हा मुद्दा ठळकपणे मांडण्यामागे अलीकडेच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुणे कसोटीची पार्श्वभूमी आहे. त्या कसोटीत प्रेक्षकांना मुलभूत सोयीदेखील मिळाल्या नव्हत्या. त्याविषयी प्रेक्षकांनी उघड नापसंती दर्शवली होती. ‘स्टेडियममधील स्वच्छतागृहांचा स्थिती कशी आहे? आसनव्यवस्था नेटकी आहे का, प्रेक्षकांना कार पार्किंगची व्यवस्था उपलब्ध आहेत का? या लहान, मोठ्या; पण महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता केल्यास प्रेक्षक पुन्हा कसोटीसाठी स्टेडियमकडे नक्की वळतील’, असे द्रविड म्हणतो. सध्या टीव्हीवर लढतींचे एचडी प्रक्षेपण पाहायला मिळते, तसेच लढतींचे थेट प्रक्षेपण करणारे अॅपही उपलब्ध झाले आहेत. त्यामुळेही प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन लढत बघण्याचे प्रमाण कमी झाले आहे. हे आपण स्वीकारायला हवे, असे द्रविडचे म्हणणे आहे. तर नियोजनच करतील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकांचा कार्यक्रम खूप आधीच जाहीर केला जातो. त्यानुसार दर्दी क्रिकेटप्रेमी सुट्ट्यांचे नियोजन करतात. आपल्याकडे तसे होत नसल्याची खंतही द्रविडने व्यक्त केली. आपल्याकडेही कसोटी मालिकांचा कार्यक्रम आधी जाहीर झाल्यास प्रेक्षक नियोजन करतील. तसेच कसोटीला अनुसरून संबंधित ठिकाणी पर्यटनाचे नियोजनही करता येऊ शकते, याकडे द्रविडने लक्ष वेधले. ‘आम्ही २००१मध्ये ईडनवर खेळलो तेव्हा एक लाख प्रेक्षक आले होते हा मुद्दा मांडताना आपण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. तेव्हा एचडी प्रेक्षपण होत नव्हते. तेव्हाचे टीव्ही संचही आतासारखे विकसित नव्हते. त्यामुळे स्टेडियममध्ये जाऊन याची देही याची डोळा लढत बघणे हाच पर्याय उपलब्ध असे. आता तंत्रज्ञान विकसित झाले आहे. घर बसल्या एचडीमध्ये चित्र दिसत असेल, तर प्रेक्षक स्टेडियमकडे का वळतील. हे सत्य स्वीकारायला हवे. इंग्लंड, ऑस्ट्रेलियातील कसोटींना स्टेडियम तुडूंब असतात. अॅशेस मालिकेला आजही मोठा प्रतिसाद असतो हेदेखील मान्य; पण तिथे कसोटी मालिकांचा कार्यक्रम खूप आधी जाहीर केला जातो. आपल्याकडे तसे होत नाही. त्यांच्याकडे डिसेंबरमध्ये ‘बॉक्सिंग डे’ कसोटी आयोजित होतेच. लॉर्ड्सवर आयोजित होणाऱ्या कसोटींचा कार्यक्रमही खूप आधी जाहीर केला जातो. त्यामुळे साधारण वर्षभर आधीच प्रेक्षक आपल्या सुट्ट्यांचे नियोजन करून तिकीटे आरक्षित करून ठेवतात’, द्रविड विस्तृत उत्तर देतो.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2QAxxmw

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...