बेंगळुरू: टी-२० मालिकेतील अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताला ९ विकेट राखून पराभूत केलं. या पराभवानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीनं रणनिती स्पष्ट केली. 'हा सामना आमच्यासाठी एकप्रकारे धडा आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपपूर्वी प्रथम फलंदाजी करून आम्ही स्वतःला आजमावत राहू,' असं तो म्हणाला. 'संघ अशा पद्धतीच्या सपाट खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्यापासून कदापि मागे हटणार नाही. अशा खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करून स्वतःला आजमावत राहू. हा आमच्या रणनितीचा भाग आहे,' असं कोहली म्हणाला. आम्हाला अशाच प्रकारची लढत अपेक्षित होती. टी-२० वर्ल्डकपपूर्वी आम्हाला अशा प्रकारच्या कठीण लढतींना सामोरं जायचं आहे. मोठ्या स्पर्धेत खेळण्यापूर्वी प्रथम फलंदाजी करण्याचा 'पॅटर्न' आजमावत राहू, असंही त्यानं सांगितलं. यावेळी कोहलीनं दक्षिण आफ्रिका संघाचं कौतुक केलं. त्यांच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात त्यांच्या गोलंदाजीला खेळपट्टीची चांगली साथ मिळाली, असं कोहली म्हणाला. कोहलीनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यावर कोहली म्हणाला, वर्ल्डकपपूर्वी कोणत्याही परिस्थितीत संघाला आजमावून पाहायचं आहे. टी-२० क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणं अपेक्षित असतं. अन्य प्रकारांमध्ये भागीदारीसाठी बराच वेळ मैदानावर खेळावं लागतं. पण इथे तर ४०-५० धावांची भागीदारी खूपच फायदेशीर ठरते.' सध्या स्थानिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी मिळत आहे. हे खेळाडू आमच्यासाठी अनोळखी आहेत असं नाही. त्यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि त्यामुळेच ते आंतरराष्ट्रीय सामने खेळत आहेत, असंही त्यानं स्पष्ट केलं.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/30jS2Kc
No comments:
Post a Comment