सिडनी (ऑस्ट्रेलिया): ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेत एक अनिर्णित राहिल्यास पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्यात येणार असल्याचा नवा नियम बनवण्यात आला आहे. वर्ल्डकप-२०१९ स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंड आणि न्यूझीलंडदरम्यानचा मूळ सामना अनिर्णित राहिल्यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली. मात्र, तरीही सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांची धावसंख्या समानच राहिली. अखेर मूळ सामन्यातील चौकार-षटकारांच्या संख्येवर इंग्लंडला विश्वविजेतेपद बहाल करण्यात आले. यावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (ICC) या नियमाबाबत चोहीकडून टीका करण्यात आली. त्यानंतर या नियमात बदल करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. नव्या नियमानुसार दोन संघांमधील सामना अनिर्णित राहिल्यास सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. मात्र, ती सुपर ओव्हर अनिर्णित राहिली, तर एक संघ स्पष्ट विजेतेपद मिळवेपर्यंत सुपर ओव्हरचा हा खेळ सुरूच ठेवण्यात येईल. ही माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी दिली. पुरूष आणि महिला अशा दोनही बिग बॅश लीग स्पर्धांमध्ये हा नियम लागू करण्यात येणार आहे. मात्र, असे असले तरी साखळी सामन्यात सुपर ओव्हर अनिर्णितच राहिली तर दोन संघांना गुण विभागून दिले जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. वर्ल्डकप २०१९च्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरमुळे इंग्लंडने विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यानंतर सुपर ओव्हर घेण्यात आली. मात्र सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले. पण या नियमामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2n2O4CW
No comments:
Post a Comment