कोलकाता : भारतीय संघाने कमालीची कामगिरी करत बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशीच विजय मिळवला. ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आलेली ही देशातील पहिली डे-नाईट कसोटी एक डाव आणि ४६ धावांनी जिंकून भारताने मालिकाही २-० ने खिशात घातली. भारतीय वेगवान गोलंदाजांनी या कसोटीत बांगलादेशची अक्षरशः दयनीय अवस्था केली. यासह भारताने अनेक विक्रमही नावावर केले. एक डाव आणि काही धावांच्या अंतराने विजय मिळवण्याची भारताची ही सलग चौथी वेळ होती. यापूर्वी जगातल्या कोणत्याही संघाने हा विक्रम केलेला नाही. १४२ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच हा विक्रम नोंदवला गेला. या कसोटी मालिकेत भारताने बांगलादेशवर दोन्ही सामन्यात एक डाव आणि धावाच्या अंतराने मात केली. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला रांची आणि पुण्यातही एक डाव आणि धावांच्या फरकाने हरवलं होतं. या सामन्यात फक्त ९६८ चेंडू फेकले गेले. त्यामुळे हा देशातला काही तरी निकाल लागणारा सर्वात छोटा कसोटी सामना ठरला. यापूर्वी भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात २०१८ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध सर्वात जलद विजय मिळवला होता. भारताचा कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या बाबतीत एलन बॉर्डर यांनाही मागे टाकलं. कर्णधार म्हणून विराटसाठी हा ३३ वा विजय होता, तर ऑस्ट्रेलियाचे बॉर्डर यांच्या नावावर ३२ विजय आहेत. दक्षिण आफ्रिकेचा ग्रीम स्मिथ (५३ कसोटी विजय) या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर यानंतर रिकी पाँटिंग (४८ कसोटी विजय), स्टीव वॉ (४१ कसोटी विजय) आणि क्लाईव्ह लॉयड (३६ कसोटी विजय) यांचा नंबर लागतो. भारतीय वेगवान गोलंदाजांनीही एकूण १९ विकेट्स घेतल्या. मायदेशात खेळलेल्या कसोटी मालिकेत वेगवान गोलंदाजांची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी कोलकात्यातच श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजांनी २०१७-१८ च्या मोसमात १७, तर इंग्लंडच्या गोलंदाजांनी १९३३-३४ ला चेन्नईत १६ विकेट्स घेतल्या होत्या. विराटने आणखी एक शतक ठोकत १३६ धावांची खेळी केली. भारतीय कर्णधार म्हणून हे त्याचं २० वं शतक ठरलं. त्याने याबाबतीत ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगलाही (१९ शतकं) मागे टाकलं. दक्षिण आफ्रिकेचा ग्रीम स्मिथ (२५) या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताच्या दोन वेगवान गोलंदाजांनी ८ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ होती. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी २०१०-११ च्या अॅशेज सीरिजमध्ये ही कामगिरी घडली होती. रेयान हॅरिस आणि मिशेल जॉन्सन यांनी ९-९ विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय दोन भारतीय वेगवान गोलंदाजांनी ५-५ विकेट्स घेण्याचीही ही पहिलीच वेळ आहे. भारतीय फिरकीपटूंना या सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. मायदेशातील हा पहिला सामना आहे, जिथे भारतीय फिरकीपटूंना यश मिळालं नाही. तर फिरकीपटूंना यश न मिळण्याची भारताच्या कसोटी इतिहासातील ही दुसरी वेळ आहे. ईशांत शर्मा ९, उमेश यादव ८ आणि मोहम्मद शमीने २ विकेट्स घेतल्या. फिरकीपटूंनी फक्त ७ षटके गोलंदाजी केली. भारताने बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावात गुंडाळल्यानंतर आपला पहिला डाव ९ बाद ३४७ धावांवर घोषित केला. यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव ४१.१ षटकात १९५ धावांवरच आटोपला. या सामन्यात एकूण ९ विकेट्स घेणारा ईशांत शर्मा सामनावीर आणि मालिकावीर ठरला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2DaU0OX
No comments:
Post a Comment