Ipl 2022, बंगळुरु : आजचा संपूर्ण दिवस आयपीएलच्या लिलावात संपला. आजच्या दिवसभरात बऱ्याच खेळाडूंचा लिलाव झाला तर काहींना कोणीही वाली उरला नाही. पण आजच्या लिलावाच्या पहिल्या दिवसात सर्वात महागडे पाच खेळाडू ठरले तरी कोण, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. पहिला खेळाडू...इशान किशन : आजच्या दिवसातला सर्वात महागडा खेळाडू ठरला तो इशान किशन. इशानसाठी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांत चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. पण अखेर मुंबई इंडियन्सच्या संघाने इशानला आपल्या संघात घेत ही बोली जिंकली. मुंबई इंडियन्सने इशान किशनसाठी तब्बल १५.२५ कोटी रुपये मोजले. आतापर्यंत मुंबई इंडियन्सने लिलावात एवढी मोठी रक्कम कोणत्याही खेळाडूसाठी मोजली नव्हती. दुसरा खेळाडू...दीपक चहर : आजच्या दिवसात सर्वाद दुसरा महागडा खेळाडू ठरला तो दीपक चहर. दीपकने दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्धच्या सामन्यांमध्ये दमदार अष्टपैलू कामगिरी केली होती. त्यामुळे त्याचा भाव या लिलावात चांगलाच वधारलेला होता. यापूर्वी दीपक हा महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघात होता. चेन्नईच्याच संघाने यावेळी दीपकला आपल्या संघात कायम ठेवले आहे. पण त्यासाठी चेन्नईच्या संघाला तब्बल १४ कोटी रुपये मोजावे लागले. तिसरा खेळाडू...श्रेयस अय्यर : आयपीएलच्या लिलावाच्या काही तास पूर्वी झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात श्रेयसने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. या गोष्टीचा फायदा श्रेयसला आयपीएलच्या लिलावात चांगलाच झाला. कारण या लिलावात त्याचा भाव चांगलाच वधारलेला पाहायला मिळाला. कोलकाता नाइट रायडर्स संघाने यावेळी तब्बल १२.२५ कोटी रुपये मोजले आणि श्रेयसला आपल्या संघात दाखल करून घेतले. त्यामुळे श्रेयस आता यावर्षी केकेआरच्या संघातून खेळताना पाहायला मिळेल. चौथा खेळाडू..शार्दुल ठाकूर : भारतासाठी आतापर्यंत दमदार अष्टपैलू खेळाडू ठरलाय तो शार्दुल ठाकूर. शार्दुल हा हार्दिक पंड्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो, असेही म्हटले गेले आणि शार्दुलनेही नावाला साजेशी कामगिरी केली आहे. आजच्या लिलावात शार्दुलाही त्यामुळेच दमदार मागणी होती. शार्दुलला यावेळी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने १०.७५ कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात दाखल करून घेतला आहे. यापूर्वी शार्दुल हा चेन्नई सुपर किंग्सच्या संघात होता आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली त्याची कामगिरी चांगलीच सुधारलेली होती. पाचवा खेळाडू..हर्षल पटेल : आयपीएलचा गेला हंगाम वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने चांगलाच गाजवला होता. त्यामुळे यावेळी हर्षलला संघात स्थान देण्यासाठी बरेच संघ उत्सुक होते. पण यावेळी हर्षलला आपल्या संघात कायम ठेवण्यासाठी आरसीबीचा संघच यशस्वी ठरला. गेल्या हंगामातील आपल्या सर्वोत्तम खेळाडूला आरसीबीच्या संघाने १०.७५ कोटी रुपये मोजत आपल्या ताफ्यात दाखल केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/KTYRLh2
No comments:
Post a Comment