नॉर्थ साऊंड : राज बावाच्या नेत्रदीपक अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने पाचव्यांदा युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषकाला गवसणी घातली. भारताने २००० साली मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली पहिले, २००८ साली विराट कोहलीने दुसरे, २०१२ साली उन्मुक्त चंदने तिसरे तर २०१८ मध्ये पृथ्वी शॉने चौथे विजेतेपद मिळवून दिले. आता यश धुलच्या नेतृत्वाखाली भारताने पाचव्या विश्वचषकाला गवसणी घातली आहे. इंग्लंडने भारतापुढे विजयासाठी १९० धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने चार विकेट्स राखत पूर्ण केले आणि विश्वचषकाला गवसणी घातली. इंग्लंडच्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कारण भारताला दुसऱ्या चेंडूवर अंगक्रिश रघुंवशीच्या रुपात पहिला धक्का बसला. त्यावेळी भारताला आपले खातेही उघडता आले नव्हते. पण त्यानंतर हरनूर सिंग आणि शेख रशिद यांच्यामध्ये ४९ धावांची दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी पाहायला मिळाली. सिंग यावेळी २१ धावांवर असताना बाद झाला आणि कर्णधार यश धुल फलंदाजीला आला. गेल्या सामन्यात यश आणि शेख यांनी दमदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला होता. पण यावेळी मात्र तसे घडले नाही. कारण यश १७ धावांवर बाद झाला आणि भारताला मोठा धक्का बसला. शेखने यावेळी सहा चौकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली, पण अर्धशतकानंतर त्याला एकही धाव करता आली नाही. त्यावेळी भारताची ४ बाद ९७ अशी अवस्था झाली होती. त्यामुळे भारतीय संघ हा सामना जिंकणार की नाही, अशी पाल चाहत्यांच्या मनात चुकचुकत होती. पण त्यानंतर गोलंदाजीमध्ये कमाल करणारा राज बावा संघासाठी धावून आला. राजने यावेळी महत्वाच्या ३५ धावा केल्या आणि भारताला विजयासमीप पोहोचवले. दुसरीकडे निशांत सिंधूने दमदार फलंदाजी करत अखेरपर्यंत किल्ला लढवला आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. राज बावा आणि रवी कुमार यांनी भेदक मारा करत इंग्लंडचे कंबरडे मोडले. भारताचा वेगवान गोलंदाज रवी कुमारने यावेळी इंग्लंडला सुरुवातीला दोन धक्के दिले. रवी कुमारने यावेळी पहिल्यांदा जेकब बेथेलला दोन धावांवर बाद केले आणि इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर रवी कुमारने इंग्लंडचा कर्णधार टॉन प्रेस्टला त्रिफळाचीत केले, टॉमला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर राज बावाने आपल्या अचूक आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर ठराविक फरकाने चार विकेट्स मिळवले आणि इंग्लंडची ६ बाद ६१ अशी अवस्था केली होती. त्यावेळी इंग्लंडचा संघ १०० धावाही पूर्ण करणार नाही, असे बऱ्याच जणांना वाटले होते, पण यावेळी इंग्लंडसाठी जेम्स रेवने १२ चौकारांच्या जोरावर ९५ धावांची खेळी साकारली आणि संघाची धावसंख्या वाढवली. त्यावेळी इंग्लंडचा संघ मोठी धावसंख्या उभारून भारतीय संघाला मोठा धक्का देईल, असे वाटत होते. पण रवी कुमारने यावेळी जेम्सचा काटा काढला आणि भारतीय चाहत्यांना हायसे वाटले. त्यानंतर रवी आणि राज यांनी प्रत्येकी एक विकेट्स मिळवत इंग्लंडचा डाव १८९ धावांवर संपुष्टात आणला. राजने यावेळी सर्वाधिक ५, तर रवीने चार विकेट्स मिळवल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/XkBZ6YM
No comments:
Post a Comment