इंग्लंड: वर्ल्डकपमध्ये रविवारी पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेवर शानदार विजय मिळवला. वर्ल्डकपच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये अत्यंत खराब प्रदर्शन केल्यानंतर रविवारच्या सामन्यात या संघाने अचानक उत्कृष्ट खेळी केल्यामुळे पाकिस्तानच्या चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. १९९२ वर्ल्डकपमध्येही पाकिस्तानची सुरुवात अशीच काहीशी झाली होती. त्यामुळे पाकिस्तान १९९२च्या विजयाची पुनरावृत्ती करतं का याबाबत क्रिकेटविश्वात चर्चा रंगत आहेत. आतापर्यंत २०१९ वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने ६ सामने खेळले असून केवळ दोन सामन्यांमध्ये पाकिस्तानला विजय मिळाला आहे तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा वेस्ट इंडिजविरोधात दारूण पराभव झाला. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडवर पाकिस्तानने विजय मिळवला तर तिसरा सामना अनिर्णित राहिला. चौथ्या आणि पाचव्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला तर सहाव्या सामन्यांत पाकने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला. १९९२ वर्ल्डकपमध्येही असाच काहीसा घटनाक्रम होता. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानला मात दिली होती. दुसरा सामना पाकिस्तान जिंकला होता तर तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यांत पराभूत झाला होता. पाचवा सामना अनिर्णित राहिला होता आणि सहावा सामना जिंकत वर्ल्डकपमध्ये पाकने आपले स्थान बळकट केलं होतं. १९९२मध्येही पाकचा सातवा सामना न्यूझिलंडविरोधात होता तर याहीवर्षी सातवा सामना न्यूझिलंड विरोधातच आहे. क्रिकेटमध्ये वनडे वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी२० वर्ल्डकप या तिन्ही स्पर्धा प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. या तिन्ही स्पर्धा पाकिस्तानने जिंकल्या आहेत. ज्या ज्यावर्षी पाकिस्तानने या तिन्ही स्पर्धांमध्ये विजय मिळवला त्या त्यावर्षी पाकिस्तानची या स्पर्धांमध्ये अत्यंत खराब सुरुवात झाली होती. वर्ल्डकपमध्ये आव्हान टिकवून ठेवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला हरवणं पाकिस्तानला गरजेचं होतं. १९९२ आणि २०१९ची वर्ल्डकपमधील पाकिस्तानच्या सुरुवातीच्या काळातील खेळामध्ये कमालीचं साम्य आहे. त्यामुळे येत्या काळात सगळ्यांना अनपेक्षित धक्का देतं पाकिस्तान दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरतो का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News http://bit.ly/2ZGmjhl
No comments:
Post a Comment