बर्मिंघम: विश्वकप स्पर्धेत भारत-इग्लंड या दोन बलाढ्य संघांमध्ये रविवारी होणाऱ्या 'हाय व्होल्टेज' सामन्याकडे अवघ्या क्रिकेट जगताचं लक्ष लागलं आहे. इंग्लंडसाठी ही लढत अतिशय महत्वाची आहे. पण भारतालाही विजयी वाटचाल कायम ठेवायची आहे. गेल्या तीन सामन्यांत अपयशी ठरलेल्या विजय शंकरला संघाबाहेर ठेवून स्फोटक फलंदाज रिषभ पंतला इंग्लंडविरुद्धच्या लढतीत संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यजमान इंग्लंडसाठी भारताविरुद्ध जिंकणं महत्वाचं आहे. पण भारताचेही ११ गुण आहेत. इंग्लंडला पराभूत करून 'विराट' टीमला उपांत्य फेरी गाठायची आहे. जायबंदी झालेला सलामीवीर शिखर धवन आणि गोलंदाज भुवनेश्वर कुमार संघाबाहेर आहे. सध्या तरी संघाच्या कामगिरीवर फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही. पण मधल्या फळीतील खेळाडूंची कामगिरी बघता इंग्लंडविरुद्धच्या लढतीत संघात फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं अंतिम अकरामध्ये कुणाला खेळवणार याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि के. एल. राहुल या स्पर्धेत फार्मात असलेला सलामीवीर रोहित शर्माला विंडिजविरुद्धच्या सामन्यात चुकीच्या पद्धतीनं बाद ठरवण्यात आलं होतं. त्यामुळं त्यानं नाराजीही व्यक्त केली होती. पण आता इंग्लंडविरुद्धची लढत महत्वाची असून, रोहितला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. शिखरऐवजी राहुलला संधी मिळाली असून, आतापर्यंत त्याची कामगिरी चांगली झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याला खेळ उंचावावा लागणार आहे. मधली फळी: विराट, रिषभ आणि केदार जाधव कर्णधार विराट कोहलीच्या बॅटमधून चांगल्या धावा बरसत आहेत. संघाला गरज असताना त्यानं कर्णधाराला साजेशी खेळी करून विजयात वाटा उचलला आहे. त्यानं सलग चार अर्धशतकं झळकावली आहेत. इंग्लंडविरुद्ध शतकी खेळी साकारण्याचा त्याचा मानस असेल. विजय शंकरनं मात्र, निराशा केली आहे. गेल्या तीन सामन्यात संधी मिळूनही तो अपयशी ठरलाय. त्यामुळं इंग्लंडविरुद्धच्या लढतीत त्याला संघाबाहेर ठेवण्याची शक्यता असून, त्याच्या जागी रिषभ पंतला संधी मिळू शकते. केदार जाधवकडून अजूनही चांगली कामगिरीची अपेक्षा आहे. विकेट कीपर-ऑलराऊंडर: धोनी आणि हार्दिक पंड्या डावाच्या अखेरीस जलद धावा करून संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्याची जबाबदारी अनुभवी धोनी आणि धडाकेबाज फलंदाज हार्दिक पंड्यावर असेल. पंड्या सध्या फलंदाजी आणि गोलंदाजीतही सरस कामगिरी करत आहे. गोलंदाज: कुलदीप, चहल, बुमराह आणि शमी भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंत भेदक मारा करून प्रतिस्पर्धी संघांना चारीमुंड्या चीत केलं आहे. भुवनेश्वरच्या जागी संघात संधी मिळालेल्या शमीनं सोनं केलं आहे. त्यानं दोन्ही लढतीत टिच्चून गोलंदाजी करून संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाचा वाटा उचलला आहे. बुमराहनंही लक्षवेधी कामगिरी केली आहे. कुलदीप-चहलची त्यांना चांगली साथ मिळत आहे. मोक्याच्या क्षणी बळी टिपून प्रतिस्पर्ध्यांवर दबाव निर्माण करण्याचं काम ते करत आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2FJ4p6i
No comments:
Post a Comment