नवी दिल्ली : शेन वॉर्न हा फिरकीचा जादुगार होता. त्याच्या नावावर बरेच विक्रमही आहेत. पण ऑस्ट्रेलियाकडून खेळताना त्याने पहिली विकेट कोणाची मिळवली होती, हे विचारल्यावर तुम्हाला त्याचे उत्तर येणार नाही. वॉर्नने पहिलीच विकेट एका भारताच्या दिग्गज खेळाडूचीच घेतली होती. शेन वॉर्नचा पहिला बळी कोण ठरला होता, पाहा...शेन वॉर्नने १९९२ साली सिडनीच्या मैदानात भारताविरुद्ध खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. वॉर्नचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. हा सामना अनिर्णीत राहीला असला तरी शेन वॉर्नने मिळवलेली ही पहिली विकेट अजूनपर्यंत काही जणांच्या लक्षात आहे. कारण वॉर्नने त्या सामन्यात भारताकडून द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूला बाद करत ऑस्ट्रेलियाला मोठे यश मिळवून दिले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करताना ३१३ धावा करता आल्या होत्या, यामध्ये वॉर्नचे २० धावांचे योगदान होते आणि त्याला कपिल देव यांनी चंद्रकांत पंडित यांच्याकरवी झेलबाद केले होते. त्यानंतर भारताची फलंदाजी सुरु झाली. यावेळी रवी शास्त्री यांनी सलामीला येत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता. शास्त्री आणि सचिन तेंडुलकर यांच्यामध्ये यावेळी चौथ्या विकेटसाठी १९६ धावांची भागीदारी झाली होती. ज्यामध्ये सचिनचा वाटा नाबाद १४८ धावांचा होता. या सामन्यात सर्वाधिक २०६ धावा शास्त्री यांनी केला होता. शास्त्री आणि सचिन यांची जोडी चांगलीच जमलेली होती. ही जोडी आता ऑस्ट्रेलियाचा पराभवाच्या दरीत ढकलणार, असे वाटत होते. पण त्यावेळी वॉर्न ऑस्ट्रेलियाच्या मदतीला धावून आला होता. कारण वॉर्नने यावेळी शास्त्री यांना डीन जोन्स यांच्याकरवी झेल बाद करत ऑस्ट्रेलियाला मोठे यश मिळवून दिले होते. त्यानंतर भारताला दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याची वेळ आली नाही आणि त्यामुळेच वॉर्नला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. पण अनेक विक्रम रचणाऱ्या वॉर्नने आपला पहिला बळी हा रवी शास्त्री यांच्या रुपात मिळवला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/ABSu9X5
No comments:
Post a Comment