ICC Womens World Cup 2022 : नवी दिल्ली : ९० च्या दशकात १० क्रमांकाच्या जर्सीची क्रिकेट विश्वात चर्चा होती. काळ बदलला आणि २१ व्या शतकात क्रिकेट चाहत्यांच्या हृदयावर ७ आणि १८ क्रमांकाची जर्सी राज्य करू लागली. या दोन क्रमांकाची जर्सी घातलेल्या खेळाडूंची जेव्हा जेव्हा जुगलबंदी जमली तेव्हा विरोधी संघांवर पराभव पत्करण्याची वेळ आली. आताही असाच काहीसा करिष्मा ७ आणि १८ क्रमांच्या जर्सीने केला आहे. या क्रमांकाची जर्सी घालणाऱ्या खेळाडूंची जोडी जमली आणि प्रतिस्पर्धी संघाचा सगळा प्लॅनच उद्ध्वस्त झाला. ही जोडी आहे हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधानाची. भारताच्या पुरुष क्रिकेट संघातील माजी जगज्जेता कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या जर्सीचा क्रमांक ७ होता, तर सध्याचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीच्या जर्सीचा क्रमांक १८ आहे. या दोन्ही खेळाडूंनी क्रिकेटच्या मैदानात काय करिष्मा केला हे वेगळं सांगायला नको. या दोन खेळाडूंनंतर याच क्रमांकाची जर्सी असलेल्या दोन महिला खेळाडूंचा दबदबा खेळाच्या आणि चाहत्यांच्या मनावर उमटला आहे. भारतीय महिला संघाची उपकर्णधार हरमनप्रीत कौरचा जर्सी क्रमांक ७ आहे, तर धडाकेबाज डावखुरी सलामीवीर स्मृती मंधानाचा जर्सी नंबर १८ आहे. या दोघीही महिला क्रिकेटमध्ये सध्या धुमाकूळ घालत आहेत. पुरुषांच्या क्रिकेटबद्दल बोलायचे झाले, तर धोनी-विराट या जोडीने भारतासाठी अनेक सामने जिंकले आहेत. मोठी धावसंख्या उभारणे असो किंवा धावांचा पाठलाग करणे असो ही जोडी जमली की विरोधकांच्या हातातील विजय निसटून जायचा. या जर्सी क्रमांकातील कनेक्शन स्मृती आणि हरमनप्रीतच्या बाबतीतही खरं ठरताना दिसत आहे. महिला विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात संघ अडचणीत आला होता. यास्तिका, मिताली, दीप्ती या प्रमुख खेळाडू ७८ धावांत पॅव्हेलियनमध्ये परतल्या होत्या. तेव्हा हरमन आणि स्मृती यांची जोडी खेळपट्टीवर जमली. आणि दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी १८४ धावांची भागीदारी केली. दोघींनी धुवाधार शतके झळकावली. आणि विश्वचषकात भारताच्या सर्वात मोठ्या धावसंख्येची नोंद केली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/5ev3oSO
No comments:
Post a Comment