कोलंबो : पहिलाच ट्वेन्टी-२० सामना जिंकत भारतीय संघाने विजयी सलामी दिली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेपुढे १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. श्रीलंकेचा संघ यावेळी या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला खरा, पण भारताच्या गोलंदाजांने यावेळी श्रीलंकेच्या गोलंदाजांवर चांगला अंकुश ठेवला. त्यामुळेच भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात ३८ धावांनी विजय साकारता आला. पहिल्याच चेंडूवर भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ मोठा फटका मारण्यासाठी गेला आणि शून्यावर बाद झाला. भारताचे खाते उघडण्यापूर्वीच त्यांना पहिला धक्का बसला होता. पण त्यानंतर संजू सॅमसन आणि कर्णधार शिखर धवन यांनी दमदार फलंदाजी केली. या दोघांनी श्रीलंकेच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार करत संघाला अर्धशतक पूर्ण करून दिले. पण यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादात संजू बाद झाला. संजूने यावेळी २७ धावांची खेळी साकारली. संजू बाद झाल्यावर शिखर धवन आणि सूर्यकुमार यादव यांनी चौथ्या विकेटसाठी ७२ धावांची दमदार धावसंख्या रचली. पण यावेळी मोठा फटका मारताना धवन आपली विकेट गमावून बसला. धवनने यावेळी ३६ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४६ धावांची खेळी साकारली. धवन बाद झाल्यावर सूर्यकुमारने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि जोरदार फटकेबाजी करायला सुरुवात केली. सूर्याने यावेळी षटकारासह आपले अर्धशतक साकार केले. अर्धशतकानंतर सूर्यकुमार आता मोठी धावसंख्या उभारेल, असे वाटत होते. पण अर्धशतकानंतर लगेचच सूर्यकुमार बाद झाला आणि भारताला मोठा धक्का बसला. पण त्यानंतरही भारताला १६४ धावा करता आल्या. श्रीलंकेच्या संघाने यावेळी भारतीय संघाचा चांगलाच पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण ठराविक फरकाने त्यांचे फलंदाज बाद होत गेले आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहर अचूक आणि भेदक मारा करत श्रीलंकेचा अर्धा संघ गारद केला. भारताच्या अन्य गोलंदाजांनीही त्यांना चांगील साथ दिली, त्यामुळेच भारताला यावेळी विजय साकारता आला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kVmFig
No comments:
Post a Comment