: नवी दिल्ली : आपण बर्याच लोकांना असे बोलताना पाहिले आहे की, माझ्याकडे पैसे असते, तर मी हे करू शकलो असतो, मी गरीब नसतो तर ते केलं असतं, पण गरिबी माझ्या स्वप्नांच्या आड येत आहे. पण काही लोक असे आहेत की, त्यांनी आपल्या परिश्रम आणि दृढनिश्चयाच्या बळावर अशा अनेक अडचणींवर मात केली आणि त्यांची स्वप्ने पूर्ण केली आणि देशाचं नावही उज्ज्वल केलं. अशीच काहीशी गोष्ट आहे मणिपूरच्या मीराबाई चानूची. एका छोट्या गावातून आलेल्या या खेळाडूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावत देशाचं नाव सातासमुद्रापार झळकावलं. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार रजत सेठी यांनी मीराबाई चानूचे एक चित्र आपल्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केले आहे. हा फोटो पोस्ट करताना त्यांनी लिहलं आहे की, ''गरिबी ही एखाद्याच्या स्वप्नांच्या प्राप्तीसाठी कधीच निमित्त ठरत नसते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर मणिपूर येथे तिच्या घरी आलेली भारताची सर्वात आवडती सैखोम मीराबाई चानू.'' टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पहिलं पदक पटकावत मीराबाईने इतिहास घडवला. वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. या विजयामुळे मीराबाईचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे. मणिपूर सरकारने मीराबाईला एक कोटी रुपयांचं रोख बक्षीस दिलं. तर डोमिनोजसारख्या अनेक कंपन्यांनी तिला आयुष्यभर मोफत सेवा देण्याची घोषणा केली आहे. मीराबाईचे पाय जमिनीवर एका यशामुळं काही तासात आपल्या परिस्थितीचा कायापालट झाल्याचं मीराबाईनं पाहिलं आपणही त्याचे साक्षीदार आहोत. पण हे सगळं झाल्यानंतरही मीराबाईच्या डोक्यात यशाची हवा गेलेली नाही. मीराबाईचा एक फोटो सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे. ज्यात दोन गोष्टी स्पष्टपणे दिसून येतात. पहिली म्हणजे एवढं सगळं घडल्यानंतरही मीराबाईचे पाय जमिनीवर आहेत. आणि दुसरे म्हणजे गरिबी कधीही तुमच्या स्वप्नांच्या आड येत नाही. 26 वर्षीय मीराबाई चानूने एकूण 202 किलो वजन उचलत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकलं. 2000च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या कर्णम मल्लेश्वरीनंतरची ती दुसरी आणि रौप्यपदक जिंकणारी पहिली वेटलिफ्टर ठरली. 2016च्या रिओ ऑलिम्पिकमधील सर्व अपयश तिने एका यशाने धुऊन टाकले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3BQST4g
No comments:
Post a Comment