नवी दिल्ली: टीम इंडियाचा माजी कर्णधार, धडाकेबाज फलंदाज आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) भावी अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक यांच्यातील 'संबंध' सर्वांनाच माहीत आहेत. या पार्श्वभूमीवर कोलकात्यात पोहोचलेल्या गांगुलीला पत्रकारांनी रवी शास्त्री यांच्याशी संबंधित प्रश्न विचारला आणि या खोचक प्रश्नाचे गांगुलीने मजेशीर उत्तर दिले. पत्रकाराने गांगुलीला विचारले, 'रवी शास्त्री यांच्याशी तू बोललास का?', गांगुलीने या प्रश्नाचे उत्तर आपल्या नेहमीच्या खास शैलीत दिले. गांगुली हसत हसत पत्रकाराला म्हणाला, का?, आता त्यांनी असे काय केले आहे? बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कोलकात्यात पोहोचलेल्या सौरव गांगुलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी सौरवला गाठत प्रश्न विचारणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना गांगुलीने वरील उत्तर दिले. सन २०१६ मध्ये संबंध बिघडल्याचे झाले होते उघड सन २०१६ मध्ये जेव्हा प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्री यांनी अर्ज केला, तेव्हा पासून गांगुली आणि रवी शास्त्री यांच्यातील संबंध बिघडण्यास सुरुवात झाली. त्यावेळी गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्यासह क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य प्रशिक्षकाची निवड करणार होते. त्यावेळी अनिल कुंबळे यांची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी आपली निवड झाली नाही हे पाहून रवी शास्त्री नाराज झाले होते. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी मुलाखती सुरू असताना बैठकीत सौरव गांगुली सहभागी झाला नव्हता असे त्या वेळी शास्त्री यांनी म्हटले होते. शास्त्री यांच्या या वक्तव्यावर भडकलेल्या सौरव गांगुलीने कडक शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली होती. रवी शात्री हे मुर्खांच्या नंदनवनात राहत आहेत आणि भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदावर त्यांची नियुक्ती न होण्याला ते स्वत: जबाबदार आहेत, असे गांगुलीने म्हटले होते. पुढे अनिल कुंबळे हे प्रशिक्षकपदावरून दूर झाल्यानंतर रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावर नियुक्ती करण्यात आली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32vp0UU
No comments:
Post a Comment