मुंबई: वर्ल्डकप स्पर्धेत 'विराट' कामगिरीच्या जोरावर कोहली ब्रिगेडनं सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडबरोबर उद्या रंगणार आहे. आतापर्यंत संघात अनेक बदल केले आहेत. जवळपास सर्वच खेळाडूंना संधी दिली आहे. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध संघात अंतिम अकरामध्ये कुणाला संधी द्यावी, असा पेच निर्माण झाला आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता संघात बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रोहित शर्मा-राहुलवर सगळ्यांच्या नजरा रोहित शर्मा आणि के. एल. राहुल या सलामीच्या जोडीनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दोघांनीही शतकी खेळी केली आहे. त्यामुळं न्यूझीलंडविरुद्ध ते डावाची कशी सुरुवात करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांना न्यूझीलंडच्या ट्रेंड बोल्ट आणि फर्ग्युसन या गोलंदाजांच्या भेदक माऱ्याचा सामना सावधपणे करावा लागणार आहे. विराट कोहली, रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक विराट कोहलीनं अर्धशतकी खेळ्या केल्या असल्या तरी मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला आहे. रिषभ पंतनंही संधीचं सोनं केलं आहे. मधल्या फळीत त्यानं चांगल्या धावा केल्या आहेत. पण त्याच्याकडून अजून अपेक्षा आहेत. दिनेश कार्तिकला संधी मिळाली असून, न्यूझीलंडविरुद्ध तडाखेबंद खेळी करून संघानं दाखवलेला विश्वास त्याला सार्थ ठरवायचा आहे. एम. एस. धोनी, हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडशी भिडणार आहे. सहाजिकच या सामन्यात टीम इंडियावर दबाव असेल. अशा परिस्थितीत धोनी चांगली कामगिरी करतो. हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजाला अष्टपैलू कामगिरी करून संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा लागेल. भुवनेश्वर, शामी आणि बुमराह मोहम्मद शामीला संधी मिळताच त्यानं गोलंदाजीत चुणूक दाखवून दिली आहे. ज्या-ज्या वेळी त्यानं गोलंदाजी केली, त्यावेळी त्यानं विकेट घेत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. बुमराह अखेरच्या षटकांत चांगली गोलंदाजी करतो. धावा रोखण्यात आतापर्यंत तो यशस्वी ठरला आहे. भुवनेश्वर कुमारनंही चांगली गोलंदाजी केली आहे. भेदक माऱ्यानं प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव आणण्याचं काम तो चोखपणे बजावतो. सेमीफायनलमध्ये शामीला संधी मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. रोहित शर्मानं या स्पर्धेत पाच शतकं ठोकली आहेत. आता न्यूझीलंडविरुद्ध तो शतक झळकावणार का? त्यांच्या सुरुवातीच्या गोलंदाजांचा सामना तो यशस्वीपणे करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे टीम इंडियाची फिरकी गोलंदाजी फारशी चुणूक दाखवू शकली नाही. चहल आणि कुलदीप यादव ही जोडी सातत्य राखण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळं न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात बदल होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. श्रीलंकेविरुद्ध जडेजानं चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळं त्याला संधी मिळू शकते. तसंच शमीला संघात स्थान दिलं तर चहल आणि कुलदीपवर संघाबाहेर बसण्याची वेळ येऊ शकते. 'अशी' असू शकते विराट सेना! रोहित शर्मा, के. एल. राहुल, विराट कोहली, रिषभ पंत, एम. एस. धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2xCmYoi
No comments:
Post a Comment