मुंबई : भारताचा महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २४ वर्षे मैदानावरील आपल्या खेळाने लाखो भारतीयांची मने जिंकली. २०१३ मध्ये निवृत्त झाल्यानंतर तो आता मैदानाबाहेरील आपल्या कामाने लोकांची मने जिंकत आहे. युवा खेळाडूंचा आदर्श बनलेला सचिन तेंडुलकर आपल्या चाहत्यांना नाराज होण्याची संधी देत नाही आणि जमेल तितके त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूही देतो. काही दिवसांपूर्वी एस.के. शाहीद या ५ वर्षीय खेळाडूचा फलंदाजी करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. शाहीदचा हा व्हिडिओ त्याच्या पालकांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता, त्यानंतर त्याची लाखो नेटकऱ्यांनी प्रशंसा तर केलीच, पण आता त्याचा आदर्श असलेल्या सचिन तेंडुलकरसोबत पाच दिवस सराव करण्याची संधीही त्याला मिळाली. शाहिदचे वडील कोलकात्यातील एका हेअर सलूनमध्ये काम करतात. त्यांनी गेल्या महिन्यात आपल्या मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओने आंतरराष्ट्रीय माध्यमे आणि दिवंगत शेन वॉर्नचेही लक्ष वेधून घेतले होते. वॉर्ननेही त्याला शुभेच्छाही दिल्या होत्या. त्यानंतर क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचेही त्याने लक्ष वेधून घेतले आणि नंतर काही दिवसांतच तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीमध्ये सराव करण्याची संधी मिळाली. नेटमध्ये फलंदाजी करताना सचिननेही शाहिदच्या फलंदाजीचा आनंद लुटला. शाहिदचे वडील शेख शमशेर यांनी शुक्रवारी पीटीआयशी बोलताना सांगितले की, ''आम्ही आमच्या ट्विटर हँडलवरून व्हिडिओ अपलोड केला होता. हा व्हिडिओ पाहून ऑस्ट्रेलियन चॅनल फॉक्स स्पोर्ट्सने देखील ट्विट केले होते. त्यांनी सचिन तेंडुलकर, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन आणि दिवंगत शेन वॉर्न यांना टॅग केले होते. आम्हाला वाटते की, सचिन सरांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर त्यांच्या टीमने आमच्याशी संपर्क साधला." विशेष गोष्ट म्हणजे शाहीद आणि त्याच्या कुटुंबाच्या मुंबई दौऱ्याचा संपूर्ण खर्च सचिनने उचलला होता. त्याचबरोबर सचिनने यावेळी त्याला मोलाचे मार्गदर्शनही केले आहे, याचा फायदा त्याला कसा होता, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/Tz2vZ4c
No comments:
Post a Comment