दुबई : भारताला पाकिस्तानकडून लाजीरवाणारा पराभव पत्करावा लागला. पण या सामन्याचा नेमका टर्निंग पॉइंट कोणता ठरला, हे भारताचा कर्णधार विराट कोहलीने सामना संपल्यावर सांगितले. सामना संपल्यावर विराटने सांगितले की, " या विजयाचे श्रेय पाकिस्तानला द्यायला हवे, कारण त्यांनी आमच्यापेक्षा सरस खेळ केला. आम्हाला मैदामात ज्या गोष्टींची अंमलबजावणी करायची होती, ती आम्हाला जमली नाही. या सामन्यात आमच्या तीन विकेट्स झटपट गेल्या आणि तिथून कमबॅक करणे ही सोपी गोष्ट नव्हती. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. त्याबरोबर या सामन्यातील दुसऱ्या डावात दव पडणार होते, हे सर्वांनाच माहिती होते आणि त्याचाही परीणाम या सामन्यावर झाला. त्यामुळे तुम्ही जेव्हा फलंदाजी करत असताना तेव्हा लक्ष्यापेक्षा १०-२० धावा जास्त तुम्हाला कराव्या लागतात. पण आमच्याकडून ते घडले नाही आणि पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानच्या गोलंदाजांबरोबर फलंदाजांनीही यावेळी चांगली कामगिरी केली." भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना काही चुका केल्या आणि त्याचा फटका त्यांना बसला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीने रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांना झटपट बाद केले आणि तोच भारताला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर कोहलीने अर्धशतक झळकावले खरे, पण त्याला पाकिस्तानपुढे मोठे आव्हान ठेवण्यात अपयश आले. त्याचबरोबर भारताच्या एकाही गोलंदाजाला यावेळी विकेट मिळवता आली नाही. त्यामुळे आता पुढच्या सामन्यात भारतीय संघ आपल्या रणनितीमध्ये कोणता बदल करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. आतापर्यंत एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतीय संघ कधीच पाकिस्तानकडून पराभूत झाला नव्हता. पण विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ही विजयाची परंपरा कायम राहिली नाही. भारताने पाकिस्तानपुढे विजयासाठी १५२ धावांचे आव्हान ठेवले होते. पण पाकिस्तानच्या फलंदाजांनी हे आव्हान सहजपणे पेलवले आणि इतिहास बदलला. कारण पाकिस्तानने एकही विकेट न गमावता भारतावर हा मोठा विजय साकारल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भारतीय संघापुढे आता पुढच्या सामन्यांपासून मोठे आव्हान असणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3Ggqd6M
No comments:
Post a Comment