वृत्तसंस्था, रांची गांधी-मंडेला करंडक कसोटी मालिकेतील अखेरच्या रांची कसोटीला प्रेक्षकांचा म्हणावा तसा पाठिंबा लाभला नाही. याबाबत विराट कोहलीला विचारणा झाली असता त्याने चोख भाष्य केले. ‘इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये जसे फक्त कसोटींसाठी काही मैदाने निश्चित केली जातात. तसेच भारतात करण्याची वेळ आली आहे’, असे मत विराटने मांडले. ऑस्ट्रेलियात मेलबर्न, सिडनी, पर्थ, ब्रिस्बेन आणि अॅडलेड येथेच कसोटींचे आयोजन होते, तर इंग्लंडलाही लॉर्ड्स, ओव्हल, ट्रेन्टब्रिज, ओल्ड ट्रॅफर्ड, एजबॅस्टन, साउदम्प्टन आणि हेडिंग्ली ही मैदाने कसोटीसाठी निश्चित करण्यात आली आहेत. मंगळवारी भारताने रांची कसोटी जिंकल्यानंतर विराटला पत्रकार परिषदेत प्रेक्षकांच्या अल्प प्रतिसादाबाबत प्रश्न आला अन् विराट म्हणाला, ‘खूप छान प्रश्न विचारलात... आम्ही बीसीसीआयसोबत याबाबत गेल्या बऱ्याच महिन्यांपासून चर्चा करत आहोत. माझ्या मते आपणही कसोटी मालिकांसाठी पाच मैदाने निश्चित करायला हवीत’. हा प्रश्न आणि त्याचे उत्तर देताना विराटच्या खुलून बोलण्यामागे बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या नेमणूकीचे निमित्त असू शकते. ‘कसोटी क्रिकेट जीवंत ठेवण्यासाठी असा ठराविक मैदानांचा पर्याय उत्तम आहे. अनेक ठिकाणे कसोटींचे आयोजन करण्यात काहीच अर्थ नाही. खासकरून अशी मैदाने जिथे कसोटीसाठी प्रेक्षक येतील की नाही याबाबत साशंकता असते. तेव्हा आपण जास्तीतजास्त पाच स्टेडियम कसोटीसाठी निवडावीत. आपल्याकडे येणाऱ्या प्रतिस्पर्धी संघांनाही अशा स्टेडियमची कल्पना असेल’, याकडे विराटने लक्ष वेधले. सध्याचे आयोजन बीसीसीआय सध्या आळीपाळीने विविध असोसिएशनच्या मैदानांना कसोटीचे यजमानपद बहाल करते. मात्र त्यानुसार सध्या जवळपास १५ ठिकाणी कसोटींचे आयोजन होते आहे. ‘आळीपाळीने यजमानपद देण्याची तुमची पद्धत, प्रत्येक शहरास यजमानपद देण्याचा आटापिठा हे सगळे मला कळते; पण तसे आपण टी-२० आणि वनडेसाठी करायला हरकत नाही. कसोटीसाठी ठराविक मैदानेच निश्चित करायला पाहिजेत. जिथे प्रेक्षकांचा पाठिंबा लाभण्याची खात्रीदेखील असेल’, असे विराटने सांगितले. फायदा असा की... ‘ठराविक मैदानांचीच कसोटीसाठी निवड करणे हे पाहुण्या संघासाठी आव्हान ठरेल. जसे आम्हाला ऑस्ट्रेलिया, इंग्लंडला जाताना वाटते. आपल्या अमुक एका मैदानावर खेळायचे आहे, तेव्हा तेथील खेळपट्टी कशी असेल? यावेळी तिथले वातावरण कसे असेल? असे प्रश्न आमच्या मनात घोंघावत असतात. तसेच ज्या ठिकाणी दर्दी क्रिकेटप्रेमी कसोटीसाठी हटकून हजेरी लावतील, अशी मैदाने निवडली तर उभय संघांनाही खेळायला मजा येते. उपस्थित हजारो प्रेक्षक आपल्या पाठिशी आहेत ही भावनाच आम्हा खेळाडूंना हत्तीचे बळ देणारी ठरते. तेव्हा अशी मैदानेच कसोटीसाठी निवडावीत’, असे विस्तृत उत्तर विराट देतो. ‘या, धोनीला हॅलो म्हणा...’ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील अखेरची झुंज रांचीत असल्याने या शहराचा लाडका लेक महेंद्रसिंग धोनी ही कसोटी बघण्यासाठी हमखास येईल, असा अंदाज होता; पण धोनीने स्टेडियममध्ये येणे पसंत केले ते भारताचा विजय निश्चित झाल्यावरच. तो मंगळवारी स्टेडियममध्ये दाखल झाला. ड्रेसिंग रुममध्येहीर आला. झारखंडचाच सुपूत्र शाहबाझ नदीमशी आपुलकीने गप्पा मारल्या. ज्यात सहाजिकच मार्गदर्शनाचा भाग जास्त होता. धोनीने संघ आणि प्रशिक्षक रवी शास्त्रींसह फोटोला पोझही (ड्रेसिंगरुममधील खासगी फोटो) दिली. दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि २०२ धावांनी विजय साजरा केल्यानंतर सहाजिकच पत्रकारांनी विराटला धोनीच्या उपस्थिती विषयी विचारले अन् त्यानेही मोजक्याच शब्दात; पण धोनीच्या आपुलकीने उत्तर दिलेः ‘होय, तो आताही भारतीय संघाच्या चेंज रूममध्ये आहे. या चला माझ्यासोबत... त्याला हॅलो म्हणा...’. ३७ वर्षांच्या महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाचा भारताला टी-२० आणि वनडेचे जगज्जेतेपद पटकावून देण्यात महत्त्वाचा वाटा आहे. मात्र यंदा जुलैमध्ये इंग्लंडला पार पडलेल्या वनडे वर्ल्डकपनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. यामुळे धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबतच नेमके काहीच स्पष्ट होत नाही. बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरही धोनीचे भारतीय संघासोबतचे फोटो शेअर केले. धोनीने यावेळी आपल्या गळ्यात स्टेडियममधील सर्वत्र प्रवेशाचे ओळखपत्र घातले होते. यावर शास्त्रींनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘भारताचा खराखुरा महान क्रिकेटपटू अन् तोदेखील त्याच्याच राज्यात असलेल्या कसोटीला हजर झाला ते पाहून खूप बरे वाटले. भारतीय संघाचा खणखणीत मालिकाविजय अन् धोनीची उपस्थिती हा योगच निराळा आहे’, असे शास्त्री यांनी म्हटले आहे. तसा धोनीसोबतचा फोटोही शास्त्री यांनी शेअर केला आहे. श्रेय रोहितला... ‘आपल्याला वाटत असलेला संकोच आणि चिंता यातून आपणच स्वतःला ठरवून बाहेर काढू शकतो. हे काम तसे अवघड असते; पण रोहितने निर्धाराने हे अवघड काम साध्य केले. त्यामुळे आज कसोटीचा सलामीवीर म्हणून त्याला जे यश लाभते आहे त्याचे श्रेय फक्त आणि फक्त रोहितचे आहे’, अशा शब्दात भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपला सीनियर सहकारी रोहित शर्माचे कौतुक केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेतून तो प्रथमच कसोटीत सलामीला आला. विशाखापट्टणम कसोटीत १७६ आणि १२७ धावांची खेळी केल्यानंतर तिसऱ्या रांची कसोटीत रोहितकडून २१२ धावांची नेत्रदीपक खेळी साकार झाली. सहाजिकच भारताच्या जेतेपदात रोहितच्या फलंदाजीचा मोठा वाटा आहे. रोहितला मालिकावीर पुरस्कारही लाभला. ‘सलामीवीर म्हणून पहिलीच कसोटी मालिका खेळत असूनही रोहितने संकोच आणि चिंता झुगारून खेळ केला. ज्याचे फलित त्याला मालिकावीर या पुरस्काराद्वारे लाभले. तो खरोखरच जबरदस्त खेळाडू आहे. वनडेमध्ये रोहित या घडीला जगातील सर्वोत्तम सलामीवीर आहे. मात्र कसोटीचा सलामीवीर म्हणून संघाला तुमच्याकडून थोड्या वेगळ्या अपेक्षा असतात. रोहितने निर्धाराने फलंदाजी केल्याने आम्हाला एका कसोटीत दक्षिण आफ्रिकेला दोनवेळा बाद करणे सहज जमले. तेव्हा रोहितचा वाटाही बहुमूल्य आहे’, रोहितची अशी प्रशंसा विराटने केली. यशाचे मानकरी १)मयांक तसा नवखा आहे; पण त्याने सलामीवीर म्हणून आपली कामगिरी चोख पार पाडली. अजिंक्यने घरच्या मैदानावर बऱ्याच वर्षांनंतर शतक झळकावले. (२०१६मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या इंदूर कसोटीत अजिंक्य रहाणेने १८८ धावांची खेळी केली होती), असे विराटने सांगितले. २)रहानेने विंडीजलाही कसोटी शतक केले होते. गेल्या दोन, तीन महिन्यांत तो जबरदस्त खेळतो आहे. माझ्या सहकाऱ्यांची वैयक्तिक कामगिरी उंचावते आहे, असे विराट नमूद करतो. ३)संपूर्ण मालिकेत आम्ही द. आफ्रिकेच्या ६० विकेट टिपल्या. ज्यातील २४ विकेट उमेश आणि शमी यांनी टिपल्या आहेत. याशिवाय त्यांचा स्ट्राइक रेट अनोखा आहे. यामुळे गेल्या काही वर्षांतील तेज गोलंदाजांमध्ये या दोघांची कामगिरी उठून दिसते. मला ही भारतीय इतिहासातील ही घरच्या मैदानावरील सर्वोत्तम कामगिरी वाटते, असे विराट म्हणाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35WqEkz
No comments:
Post a Comment