नवी दिल्ली: वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या कसोटीला गुरुवारपासून सुरुवात होत असून, अंतिम अकरामध्ये कुणाला खेळवायचं हा प्रश्न टीम इंडिया आणि कर्णधार विराट कोहलीसमोर आ वासून उभा राहिला आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यापैकी एकाला; अथवा पाचव्या गोलंदाजाला मैदानात उतरावायचं या पेचात टीम इंडियाचं व्यवस्थापन अडकलं आहे. टीम इंडिया सात महिन्यांनंतर कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. गुरुवारपासून वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. टीम इंडिया जुन्या रणनितीनुसार विचार करत असेल तर के. एल. राहुल आणि मयंक अग्रवाल यांना सलामीला खेळवण्याची दाट शक्यता आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम दोन कसोटी सामन्यांत राहुलची निवड न करता संघानं हनुमा विहारीला संधी दिली होती. त्यावेळी हनुमानं फलंदाजीत विशेष कामगिरी केली नसली तरी, गोलंदाजीत चमक दाखवली होती हेही लक्षात घ्यायला हवे, असं काहींचं मत आहे. राहुलच्या गेल्या वर्षभरातील कामगिरीचा विचार केला तर हनुमाला सलामीला खेळवण्याची शक्यता अधिक आहे, असं मानलं जात आहे. चेतेश्वर पुजारा आणि हे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर खेळतील. पाचव्या क्रमांकावर कोण खेळणार हाच खरा प्रश्न आहे. विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. विकेटकीपर वृद्धिमान साहा हा वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेला आहे. कसोटी क्रिकेटसाठी पंतपेक्षा साहा उजवा आहे. जायबंदी असल्यानं तो कसोटी क्रिकेटपासून दूर होता. त्यामुळं पंतला संधी मिळाली होती. त्यानं ऑस्ट्रेलियात शतकी खेळी केली होती. तर साहानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दोन अर्धशतके केली होती. त्यामुळं या दोघांपैकी कुणाला खेळवायचं असा पेच टीम इंडियासमोर आहे. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत रवींद्र जाडेजाला सातव्या क्रमांकावर खेळवू शकतात. अशा परिस्थितीत रोहित किंवा रहाणेपैकी एकाची निवड कोहली करू शकतो. अतिरिक्त फलंदाज खेळवला तर संघात केवळ एक फिरकीपटू आणि तीन जलदगती गोलंदाज असतील. त्यामुळं जाडेजाचा पत्ता कट होऊ शकतो. कर्णधार कोहली पाच गोलंदाज खेळवण्याच्या बाजूने आहे. कारण कसोटी सामना जिंकण्यासाठी २० फलंदाजांना बाद करणे आवश्यक असते. खेळपट्टी जलद गोलंदाजांसाठी अनुकूल असेल तर बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांच्यासह उमेश यादवलाही संधी मिळू शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Z60xaZ
No comments:
Post a Comment