नवी दिल्ली : भारतीय संघावर पहिल्याच दिवशी ऑलऑऊट होण्याची नामुष्की ओढवली. भारताचा पहिला डाव १९१ धावांमध्ये आटोपला. त्यामुळे भारतीय संघ पुन्हा एकदा पराभवाच्या दरीत कोसळणार, असे वाटत होते. पण पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी मोठे यश मिळवले असून संघाच्या मार्गातील एक मोठा काटा त्यांनी दूर केला आहे. भारताच्या १९१ धावा या इंग्लंडचा फॉर्म पाहता माफक वाटत होत्या. पण भारताच्या गोलंदाजांनी यावेळी संघाला पुनरागमन करण्याची वेळ दिली. कारण गोलंदाजांनी यावेळी भेदक मारा केल्यामुळे भारताला पहिल्या दिवशी चांगले यश मिळवता आले. भारताच्या मार्गातील मोठा काटा हा इंग्लंडचा कर्णधार जो रुट हा समजला जातो. कारण गेल्या तिन्ही सामन्यांमध्ये रुटने शतकं झळकावलेली आहे. पण चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात मात्र रुटला २१ धावांवर बाद करत भारताला वेगवान गोलंदाज उमेश यादवने मोठे यश मिळवून दिले. त्यापूर्वी जसप्रीत बुमराने इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना झटपट आऊट करत इंग्लंडला दुहेरी धक्के दिले होते. पण यावेळी रुटला बाद करत उमेशने इंग्लंडला मोठा धक्का दिला आहे. रुटने पहिल्या डावाची जबरदस्त सुरुवात केली होती. रुटने २५ चेंडूंत चार चौकारही लगावले होते. पण त्याला २१ धावांमध्ये समाधान मानावे लागल्यामुळे भारताला आता चौथ्या कसोटीत आघाडी घेण्याची नामी संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतीय संघ या संधीचा फायदा कसा उचलतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडची ३ बाद ५३ अशी स्थिती आहे. तत्पूर्वी, भारताचा पहिला डाव १९१ धावांमध्ये आटोपल्याचे पाहायला मिळाले. भारताच्या फलंदाजांनी यावेळी पुन्हा एकदा हाराकिरी पत्करली. भारताकडून विराट कोहली आणि शार्दुल ठाकूर यांनी अर्धशतकं झळकावल्यामुळे भारताला १९१ धावा तरी करता आल्या. कोहलीने अर्धशतक झळकावले असली तरी त्याला यावेळी ५० धावांवरच समाधान मानावे लागले, अर्धशतकानंतर मोठी खेळी कोहलीला करता आली नाही. शार्दुलने यावेळी भारतीय संघाची लाज वाचवत ५७ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jFwRKy
No comments:
Post a Comment