दुबई : टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला फटकारलं आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई २१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना सातव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आल्याने गंभीरने धोनीला टोला लगावला. त्याने किमान समोरुन लढायला हवं होतं. सातव्या क्रमांकावर येणं म्हणजे समोरुन लढणं होत नाही, असं गंभीर म्हणाला. राजस्थानविरुद्ध चेन्नईचा १६ धावांनी पराभव झाल्यानंतर गंभीरने हे वक्तव्य केलं. चेन्नईची अवस्था ११४ बाद ५ अशी झालेली असताना धोनी १४ व्या षटकात फलंदाजीसाठी उतरला. चेन्नईला विजयासाठी अजूनही १०३ धावांची आवश्यकता होती. धोनीने लवकर उतरायला हवं होतं, असं अनेक जाणकारांचंही म्हणणं आहे. पण धोनीने अगोदर ऋतुराज गायकवाड आणि सॅम करन यांना पाठवल्याने तो टीकेचा धनी झाला. गंभीर ESPNCricinfo शी बोलताना म्हणाला, 'खरं सांगायचं तर मला आश्चर्य वाटलं. धोनी सातव्या क्रमांकावर आला? आणि गायकवाडला, सॅम करनला स्वतःच्या अगोदर पाठवलं. याला काहीही अर्थ नाही. किमान तू समोरुन लढायला हवं होतंस. याला समोरुन लढणं म्हणत नाहीत. २१७ धावांचा पाठलाग करत असताना सातव्या क्रमांकावर फलंदाजी? खेळ संपलेला होता. फफ डू प्लेसिसने एकाकी झुंज दिली,' 'रैनाची कमी भासत नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न' 'तुम्ही धोनीच्या अखेरच्या षटकाबद्दल बोलू शकता, जिथे त्याने तीन षटकार लगावले. पण खरं सांगायचं तर त्याचा काहीही उपयोग नव्हता. एखाद्या दुसऱ्या कर्णधाराने हे केलं असतं आणि अशा परिस्थितीत तो सातव्या क्रमांकावर आला असता तर त्याच्यावर टीकेचा भडीमार झाला असता. पण हा धोनी आहे म्हणून यावर कोणी बोलत नाही. तुमच्याकडे सुरेश रैना नाही तेव्हा तुम्ही आमच्याकडे सॅम करन आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्हाला लोकांना दाखवून देत आहात की, ऋतुराज गायकवाड, करन, केदार जाधव, फफ डू प्लेसिस, मुरली विजय हे सर्व त्याच्यापेक्षा चांगले आहेत', असंही गंभीर म्हणाला. दरम्यान, धोनी सुरुवातीला आल्यानंतर तो अत्यंत संथ गतीने खेळत असल्याचं दिसून आलं. त्याच्या १२ चेंडूत केवळ ९ धावा होत्या. अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी ३८ धावांची आवश्यकता होती. याच षटकात धोनीने तीन षटकारांच्या मदतीने २० धावा काढल्या. 'तुम्ही सुरुवातीलाच बाद झालात तर त्यात चूक काहीच नाही. किमान समोरुन लढायला हवं, संघालाही प्रेरणा द्यायला हवी. अखेरच्या षटकातच का खेळला? हेच चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर येऊन शक्य झालं असतं. फफ सोबत मिळून धोनीने सामना जिंकलाही असता. पण तसा काहीही हेतू दिसत नव्हता', असं गंभीर म्हणाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/361nKh4
No comments:
Post a Comment