Ads

Saturday, August 14, 2021

राहुल द्रविडच नाही, तर आणखी चार दिग्गज आहेत भारताच्या प्रशिक्षक पदासाठी प्रबळ दावेदार

नवी दिल्ली : रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने अनेक द्विपक्षीय मालिका जिंकल्या. पुढील महिन्यात यूएईमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. मुख्य प्रशिक्षक पदासाठी राहुल द्रविडच्या नावाची जोरदार चर्चा असली तरी या शर्यतीत आणखी चार दिग्गजांचाही समावेश आहे. कोण आहेत ते दिग्गज? याबद्दल जाणून घेऊयात. टॉम मूडी : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांची गणना जगातील सर्वोत्तम प्रशिक्षकांमध्ये केली जाते. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक असलेले मूडी यांनी त्यांच्या कार्यकाळात 2016 मध्ये संघाला चॅम्पियनही बनवले आहे. टॉम यांच्या प्रशिक्षणाखाली सनरायझर्स हैदराबादचा संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. माहेला जयवर्धने : श्रीलंकेच्या महान फलंदाजांपैकी एक असलेला माहेला जयवर्धने आजकाल प्रशिक्षणात आपला हात आजमावत आहे. माजी कर्णधार राहिलेल्या जयवर्धनेने इंग्लंड क्रिकेट संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सही त्याच्या नेतृत्वाखाली मैदानात चांगली कामगिरी करत आहे. माईक हेसन : न्यूझीलंडमधून बाहेर पडल्यानंतर जगभरात आपला वेगळा ठसा उमटवणारे प्रशिक्षक म्हणून हेसन यांची ओळख आहे. हेसन टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी एक परिपूर्ण उमेदवार आहेत. ब्रेंडन मॅक्युलमनंतर ब्लॅक कॅप्सने क्रिकेटमध्ये जो क्रांतिकारी बदल घडवून आणला, त्याचं श्रेय हेसन यांना जातं. सध्या ते आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संचालक म्हणून काम पाहत आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मण : भारतीय आणि जागतिक क्रिकेटचा मोठा अनुभव भारताचा मधल्या फळीतील माजी फलंदाज लक्ष्मणच्या पाठीशी आहे. आयपीएलमध्ये तो टॉम मूडीसह सनरायझर्स हैदराबादसाठी तरुण खेळाडूंना क्रिकेटचे धडे देत आहे. जागतिक क्रिकेटमध्ये असे काही क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी आपल्या मनगटाच्या बळावर धावा फटकावल्या आहेत, 'व्हेरी व्हेरी स्पेशल' लक्ष्मण त्यापैकीच एक आहे. राहुल द्रविड : द्रविडचे नाव पहिल्यापासूनच मुख्य प्रशिक्षक पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून चर्चिले जात आहे. निवृत्तीनंतर द्रविडने अनेक कनिष्ठ क्रिकेटपटूंसोबत काम केले. १९ वर्षांखालील आणि भारत अ संघालाही त्यानेच प्रशिक्षण दिले आहे. तसेच तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालकही राहिला आहे. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या तीन एकदिवसीय आणि टी-20 मालिकांमध्ये त्याची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघाने वनडे मालिका 2-1 ने जिंकली आणि टी-20 मालिका 1-2 ने गमावली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3AJRXgs

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...